आगळा वेगळा हृद्यस्पर्शी विवाहसोहळा
 महा एमटीबी  10-Jan-2018
 

 
 
 
सध्या सर्वत्र लग्नसोहळ्यांचा धूमधडाका आहे. १६ पवित्र संस्कारांपैकी एक असलेला विवाह संस्कार प्रत्येक व्यक्तीसाठी महत्त्वपूर्ण असतो. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने हा सोहळा खास करण्याचा, संस्मरणीय करण्याचा प्रयत्न करत असतो. विवाह सोहळ्यासाठी कुणी पंचतारांकित हॉटेल निवडतात तर कुणी अद्ययावत क्लब. आजकाल ‘डेस्टिनेशन वेडिंग’ चा जमाना आहे. त्यामुळे रम्य समुद्रकिनारे, भव्य राजवाडे, महाल, रिसॉर्टस शोधले जातात.
 
वधु-वरांसाठी घोडे, पालख्या, बग्ग्या, गाड्या तर थेट हेलिकॉप्टरची व्यवस्था होते. सभागृहात राजेशाही सजावट, दिव्यांचा लखलखाट, शाही मेजवानी, शेकडो खुसखुशीत पदार्थांची रेलचेल असते. हौसेला काही मोल नाही, असे म्हणतात. उपस्थित पाहुणे मंडळींनाही वेगळेपणा, नाविन्य अनुभवण्याची आस असते, औत्सुक्य असते. अशा लखलखीत, राजेशाही थाट मागच्या लग्नसोहळ्याच्या आजच्या जमान्यात नुकताच अनुभवलेला विवाह सोहळा विशेष लक्षवेधी ठरला. समारंभाला विचारांची, समाजभानाची वेगळीच उंची प्राप्त झाल्यामुळे उपस्थितांसाठी संस्मरणीय ठरला आणि अंतर्मुख करून गेला.
 
रविवार दि. १० डिसेंबर रोजी गोरेगाव पूर्व येथील लँडमॉर्क हॉल सज्ज होता. निमित्त होते प्रेक्षा देशपांडे आणि निहार सशित्तल यांच्या मंगल परिणयाचे. वधु-वर दोघेही उच्चशिक्षित, अभियांत्रिकीत पदव्युत्तर शिक्षण अमेरिकेत घेऊन तेथेच नोकरीत कार्यरत असलेले. आपल्या अमेरिकेतील वास्तव्यातही समाजोपयोगी कामात दोघेही कार्यमग्न असलेले. वधुपिता मंगेश देशपांडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दिडोंशी भाग सेवा प्रमुख. वधुवरांचे नातेवाईक व मित्रपरिवार अशी ५५० ते ६०० निमंत्रित मंडळी वधुवरांना आशीर्वाद देण्यासाठी सभागृहात उपस्थित होती. महिला पुरोहिता सुनंदाताई आपटे व त्यांच्या तीन सहकार्‍यांमार्फत विवाह संस्कार पार पडल्यावर साहजिकच वधुवरांना भेटण्यासाठी निमंत्रितांची लगबग सुरू झाली.
 
अचानक ध्वनिक्षेपकावरून आवाहन केले गेले सर्वांना स्थानापन्न होण्याचे. सगळ्यांनाच आश्‍चर्य वाटले. सभागृहात स्तब्धता येण्यासाठी काही क्षण निघून गेले. आपल्या नवजीवनाच्या पदार्पणाच्या मंगल प्रसंगी समाजोपयोगी संस्थांना मंगलनिधी अर्पण करण्याची वधुवरांची इच्छा व्यक्त केली गेली. विविध क्षेत्रात सेवाकार्य करणार्‍या चार संस्था, कार्यकर्ते व लाभार्थी यांचा थोडक्यात परिचय करून देण्यात आला.
 
 
आपले घरदार सोडून मुंबईसारख्या शहरात धाव घेणार्‍या मुलांची संख्या खूप मोठी आहे. रेल्वे जंक्शनवर पळून आलेल्या मुलांसाठी काम करणारी ‘समतोल फाऊंडेशन’ ही संस्था. व्यक्तिगत किंवा कौटुंबिक कारणांनी घरातून पलायन करणारी ही मुले फक्त गरीब कुटुंबातील असतात असे नाही, तर उच्चभ्रू घरातीलही असतात. रेल्वे स्टेशनवर आसरा घेणारी ही मुले व्यसनाधीन किंवा गुन्हेगारी जगताकडे वळण्याची दाट शक्यता असते. अशा मुलांशी संवाद साधून, माहिती मिळवून, शिबिराद्वारे मनपरिवर्तन घडवून त्यांना स्वतःच्या परिवाराशी जोडण्याचे काम ‘समतोल फाऊंडेशन’ सुमारे १४ वर्षे करत आहे.
 
रेल्वे पोलीस, कार्यकर्ते, सरकारी यंत्रणा आणि एनजीओंच्या समन्वयाने ‘समतोल’चे काम चालू असते. संस्थापक विजय जाधव यांनी स्वतःच्या घरात सुरू केलेल्या या कामाचा व्याप खूप वाढला असून आजपर्यंत आठ हजार मुलांना त्यांच्या परिवाराशी, मातृगावाशी आणि मातृभाषेशी जोडण्यात संस्था यशस्वी झाली आहे. आता महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या संस्थेचे सुरत, हैद्राबाद, कोलकाता येथे आयाम वाढविण्याचा संस्थेचा मानस व्यक्त केला गेला. ‘समतोल’चे मित्र बनून कार्यकर्ता, शिबिरासाठी मार्गदर्शन व आर्थिक मदतीचे आवाहन या प्रसंगी करण्यात आले. संस्थेचे कार्यकर्ते गणेश साठे यांनी नवदाम्पत्याकडून या प्रसंगी निधी स्वीकारला.
 
सेवा वस्तीत काही उपक्रम राबवावेत यासाठी गोरेगाव येथील कार्यकर्ते मुकुंद कुलकर्णी यांनी वधुवरांकडून मंगलनिधी स्वीकारला. माधव सेवा फांऊडेशनची स्थापना करण्यात आली. अभ्यासिकेच्या उपक्रमाने सुरूवात करून कौशल्य विकास, महर्षी सांदिपनी शिष्यवृत्ती योजना, महापालिका शाळांत जाऊन विशेष प्रशिक्षण असा संस्थेचा उत्तरोत्तर विकास होत गेला. इयत्ता ८ वी पासून आज अभियांत्रिकीच्या पदविकेच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या महेश धुरी या शिष्यवृत्ती लाभार्थी विद्यार्थ्याने आपण व्यवसायात स्थिरावल्यावर आपल्याप्रमाणे इतरांना मदतीचा हात देण्याची तायारी आपल्या मनोगतात व्यक्त केली. संस्थेचे संस्थापक आदित्य राठी यांनी यावेळी मंगलनिधी स्विकारला. भारताचा अविभाज्य भाग असलेला पूर्वांचल हा दुर्गम भाग अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. निरक्षरता, अलगाववाद, मतांतरण, आरोग्य सुविधांचा अभाव, प्रवासाची दुर्गमता या सर्वांचा गैरफायदा काही अलगाववादी घेत असतात. त्यामुळे सीमावर्ती भाग अशांत आणि अस्थिर आहे. पूर्वांचलातील विद्यार्थ्यांना देशाच्या उर्वरित भागात नेऊन योग्य शिक्षण देणे, समर्थ बनवून पुन्हा व्यवसायासाठी आपपल्या गावात पाठवणे हे कार्य केले जाते ते अभ्युद्य प्रतिष्ठानतर्फे. संस्थेतर्फे एकूण ८ वसतीगृह चालवली जातात. या संस्थेचे पालक कार्यकर्ते मुंकुंद कुळकर्णी यांनी यावेळी मंगलनिधी स्विकारला. या संस्थेचा पहिला विद्यार्थी झिंलाक झेलियांग याचे मनोगत अत्यंत हृद्यस्पर्शी होते. आपल्याला मिळालेल्या शिक्षणाच्या संधीमुळे एक व्यक्ती म्हणून आपली जडणघडण कशी झाली हे झिंलाकने उलगडून दाखवले. आपल्या आयुष्याला मिळालेली कलाटणी इतरांच्याही वाट्याला यावी, या हेतूने झिंलाक आता कार्यकर्त्यांच्या भूमिकेत वावरत असल्याचे समजताच उपस्थितांनी उत्स्फूर्त टाळ्यांनी त्याचे अभिनंदन केले. निसर्गाचे अपूर्व वरदान लाभलेल्या पूर्वांचलला सर्वांनी भेट देण्याचे आवाहनही याप्रसंगी त्याने आवर्जून केले.
 
चौथी वैशिष्ट्यपूर्ण सेवाकार्य करणारी संस्था होती ठाण्याची सिग्नल शाळा. मुंबईसारख्या शहरात प्रवास करताना सिग्नलवर गाडी थांबली की काहीबाही विकणारी किंवा भीक मागणारी मुले आपण नेहमी बघतो. बदलत्या ॠतूनुसार ही मुले वेगवेगळी उत्पादने विकत असतात. ’समर्थ भारत व्यासपीठ’ या सामाजिक संस्थेच्या ठाणे शाखेने या रस्त्यावर मुलांना शिक्षण देण्यासाठी सुरू केली सिग्नल शाळा. ठाणे महानगरपालिकेच्या पुढाकाराने संस्थेचे शाळेचे स्वप्न जुळून आले आणि महापालिकेने दिलेल्या कंटेनरमध्ये ही अनोखी शाळा सुरू आहे.आज पन्नासपेक्षा जास्त विद्यार्थी येथे पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेत आहेत. हे विद्यार्थी ठाणे महानगरपालिकेच्या पटलावर आहेत. भरकटलेले आयुष्य जगणार्‍या मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्याचा प्रचंड संघर्ष संस्था समर्थपणे करत आहे. शाळेच्या शिक्षिका प्रतिभाताईंनी या प्रसंगी वधुवरांकडून निधी स्वीकारला. २०-२५ मिनिटांच्या या नेटक्या आणि सूसत्र कार्यक्रमाची सांगता सिग्नल शाळेच्या मुलांनी सादर केलेल्या अर्थपूर्ण प्रार्थनेने झाली.
 
‘‘हीच अमुची प्रार्थना
अन् हेच अमुचे मागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे
धर्म, जाति, प्रांत,
भाषा द्वेष सारे संपू दे
एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे,
अन् पुन्हा पसरो
मनावर शुद्धतेचे चांदणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे
 
 
सेवाकार्य करणार्‍या संस्थांच्या कार्याचे वैविध्य आणि व्याप्ती उपस्थितांना अवाक् करून गेली. सभागृहात काही काळ स्तब्धता आली. सर्वच श्रोतृसमुदाय भारवून गेला.
 
 
आपल्या वैवाहिक आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्याची सुरुवात करताना सामाजिक बांधिलकी जपत प्रेक्षा आणि निहार या दाम्पत्याने आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दीड लाखाचा निधी या चार सेवापयोगी कामांसाठी अर्पण केला. देशपांडे व सशित्तल कुटुंबीय एवढ्यावरच थांबले नाहीत. शक्य असल्यास या दानाच्या कार्यक्रमात यथाशक्ती हातभार लावण्याचे निवेदनहीही उपस्थितांना करण्यात आले. मंचावर मंगल कलश ठेवण्यात आले. वधुवरांना उपस्थितांकडून आलेल्या भेटीचे अर्पण त्या कलशात केले गेले. उपस्थित सर्व समुदाय कार्यक्रमाने प्रेरित झाला आणि त्यांनी चारही संस्थाच्या कार्यकर्त्यांकडून या संस्थांची अधिक माहिती करून घेतली. पत्रके घेतली. सढळहस्ते मदतही केली. या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने मंगल कलशात सुमारे एक लाखाचा निधी जमा झाला तर संस्थांना साठ हजाराची मदत मिळाली. काहींनी संस्थेच्या कामात सक्रिय सहभागी होण्याची इच्छाही व्यक्त केली.
 
देशपांडे कुटुंबीयांचे स्नेही संतोष सावंत यांनी आपल्या आईच्या ९० व्या वाढदिवसाप्रीत्यर्थ शालोपयोगी साहित्याचे ९० किटस् उपस्थित संस्थांना अर्पण केले. सेवावृत्ती आणि सामाजिक भान जपणार्‍या जागृत नागरिकांद्वारे आयुष्यातील महत्त्वपूर्ण प्रसंगी निधी मिळणे नक्कीच सुखावह आहे. सजावट, थाटमाट या पलीकडे जाऊन आपल्या आनंदाच्या क्षणी दुसर्‍यांच्या जीवनात आनंद पसरविण्यासाठी जागरुक असणे आणि ही जाणीव, हे भान युवा वयात असणे यासाठी प्रेक्षा आणि निहार यांचे अभिनंदन करावयास हवे. त्याचबरोबर त्यांना असे संस्कार देणार्‍या त्यांच्या कुटुंबीयांचेही. नवदाम्पत्याच्या सेवाभाव आणि निर्धारामुळे उपस्थित सर्वांचे लक्षलक्ष आशीर्वाद त्यांना मिळालेच शिवाय उपस्थितांच्या मनावर शुद्धतेचे शुभ्र चांदणे निश्‍चितच पसरून गेले. आणखी एका कारणासाठी हा सोहळा वैशिष्ट्यपूर्ण ठरला. अनेक विवाह सोहळ्यात वधु-वरांच्या वेशभूषा होईपर्यंत उपस्थितांना वधुवरांना शुभेच्छा देण्यासाठी ताटकळत बसावे लागे. लग्न, मुहूर्त आणि भोजनव्यवस्था यामधील वेळेचा अपव्यय होतोय, या चिंतेत असलेल्या उपस्थितांना आपल्या वेळेचा प्रत्येक क्षण सदुपयोगी ठरल्याचे समाधान तर या सोहळ्यात मिळालेच परंतु आपल्या व्यक्तिगत आणि कौटुंबिक जीवनातील असे प्रसंग अधिकाधिक समाजाभिमुख कसे करता येतील याची दृष्टीही मिळाली असेल यात शंका नाही.
 
 
- शर्मिला भागवत  (९८६९४७५८६२)