त्यांचे योगदान, तिची तळमळ...
 महा एमटीबी  10-Jan-2018
 

 
 
कोट्यवधी भारतीयांचे रक्षण करण्याची जबाबदारी पार पाडणारे भारतीय सैनिक युद्धामध्ये शहीद झाल्याच्या बातम्या वरचेवर कानावर पडत असतात. युद्धामध्ये शहीद झालेल्या सैनिकांच्या बातम्या झळकल्यानंतर हळहळ व्यक्त केली जाते. सामान्य नागरिकांपासून ते राजकीय, सामाजिक, मनोरंजन अशा प्रत्येक क्षेत्रातील मंडळी त्या कुटुंबांना प्रत्यक्ष भेटून किंवा सोशल मीडियावर शोक व्यक्त करतात. शहीद झालेल्या जवानांच्या मुलांची शैक्षणिक जबाबदारी स्वीकारण्यासाठी समाजातील अनेक दानशूर पुढे येत आहेत. अर्थात, ही बाब कौतुकास्पद असली तरी नकळत का होईना, काही गोष्टींचा विसर आपल्याला पडत असतो.
 
ज्याप्रमाणे माध्यमांमार्फत शहीद झालेल्या जवानांच्या कार्याची दाखल घेतली जाते, त्याच तुलनेने युद्धामध्ये जोखीम पत्करून जखमी झालेले जवान दुर्लक्षित होत असतात. त्याविषयी फारसे बोलले जात नाही आणि अशा जवानांचे कार्य जगासमोर येत नाही. हे चित्र बदलण्यासाठी, नकळतपणे आपल्याकडून होत असलेली चूक सुधारण्यासाठी, त्याची जाणीव करून घेण्यासाठी एका २३ वर्षीय तरुणीने समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी एक मोहीम सुरू केली आहे. युद्धामध्ये शत्रूशी लढताना अनेक जवान गंभीरीरित्या जखमी झाल्याने अशा जवानांना पुन्हा लढण्यासाठी उभे राहणे शक्य नसते. पण होत असं की, समाजामध्ये अशा जवानांबद्दल फारशी आपुलकी दाखवली जात नाही. शहीद झालेल्या जवानांना मरणोत्तर पुरस्काराने सन्मानित केले जाते परंतु, जखमी झालेले, कायमचे अपंगत्व आलेले सैनिकांच्या कामाची दखल फारशी घेतली जात नाही. त्यामुळे हे चित्र बदलण्यासाठी गुजरातमध्ये राहणार्‍या मित्सु चावडाने राष्ट्रव्यापी बाईक ट्रिप ’राईड फॉर सोल्जर्स’ नावाची एक मोहीम सुरू केली.
 
मातृभूमीची सेवा करताना अनेक सैनिक गंभीर जखमी होतात. काही वेळेस एखादा अवयव कायमस्वरूपी निकामी होत असल्यामुळे त्यांना अपंगत्व येते पण, हे सगळं प्रकाशात येत नाही आणि आपण त्याचा कधीही विचार करत नाही. त्यामुळे भारतीयांना या अशा सैनिकांची दखल घ्यावी, त्यांचे मानसिक बळ कसे वाढवता येईल, तसेच त्यांच्यापर्यंत आर्थिक मदत कशी पोहोचवता येईल, याची जाणीव करून देण्यासाठी मित्सुने ही मोहीम सुरू केली. गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश, ओडिशा या राज्यांमधून जवळपास पाच हजार किलोमीटरचा प्रवास करून लोकांमध्ये ती परिवर्तन करत आहे. या मोहिममध्ये मित्सु शाळा, महाविद्यालये, क्लब, तसेच सार्वजनिक ठिकाणी जाऊन ’’जखमी झालेल्या सैनिकांचा आपण आदर केला पाहिजे, त्यांनी देशासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना समाजात मान-सन्मान दिला पाहिजे, ’’असे कळकळीचे आवाहन करत आहे. आतापर्यंत मित्सुने केलेल्या प्रवासामध्ये तिला स्वच्छ शौचालयाची समस्या सोडली तर कोणताच अडथळा आलेला नाही. तसेच सुरक्षिततेच्याबाबतीत आवश्यक असणारी सर्व खबरदारी घेत असल्याचे मित्सु आवर्जून सांगते.
  
मित्सुचे वडील लेखापरीक्षक असून आई गृहिणी आहे. सुरुवातीला मित्सुच्या डोक्यात ही कल्पना आल्यावर तिच्या आई-वडिलांनी विरोध दर्शवला होता. परंतु, काही काळानंतर हे चित्र बदलले आणि मित्सुच्या आई-वडिलांनी होकार दर्शवला. या मोहिमेदरम्यान हवामानात झालेले बदल, नियोजित वेळेत एखाद्या ठिकाणी पोहोचण्यासाठी पार करावे लागणारे अडथळे यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागला. मग अशावेळेस वेळापत्रकामध्ये बदल करून किंवा ठरवलेला मार्ग बदलून मित्सु मोहीम पूर्ण करण्यावर अधिक भर देत असते. ही मोहीम सुरू करण्याच्या आधी मित्सुने मोटारसायकल शिकवण्यापासून तयारी करावी लागली. तिच्या या कार्यामध्ये मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांनी मोलाची मदत केली. ज्या ठिकाणी मित्सु जात असते, तिकडचे स्थानिक तिच्या राहण्याची, जेवणाची उत्तम सोय करून देतात. मित्सुने आपल्या २५ व्या वाढदिवसापर्यंत २५ हजार लोकांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य निश्‍चित केले आहे.
 
 
 
- सोनाली रासकर