'झिरो' मधून बुटका शाहरुख दिसणार...
 महा एमटीबी  01-Jan-2018

बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान, नेहमी काही ना काही नवीन प्रयोग करत, आपल्या प्रेक्षकांना खुश करत असतो. कधी डॉन बनतो, तर कधी स्वतःचाच जबरा फॅन बनतो. २०१७ च्या शेवटच्या दिवशी, #Kal5BajeSRK हा नवीन हॅशटॅग वापरून ट्विट करत शाहरुख, कतरीना, आनंद राय आणि अनुष्का यांनी आपल्या प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता वाढवून ठेवली.
 
 
आनंद एल. राय यानी दिग्दर्शित केलेला 'झिरो' चित्रपटाचे 'टायटल अनाऊन्समेन्ट' आज सोशल मीडियावरून करण्यात आली. चक्क एक नाही, दोन नाही, तर तब्बल १२ महिन्यांआधीच चित्रपटाचे नाव प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटाची निर्मिती गौरी खान करत असून, 'रेड चिलीज' आणि 'कलर येल्लो प्रोडक्शन' यांनी एकत्र येऊन हा चित्रपट बनवला आहे. या चित्रपटाच्या शीर्षक घोषणेबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता लागून होती, म्हणूनच की काय युट्युबला अर्ध्या तासात या व्हिडिओला १२ हजाराच्यावर लाईक्स मिळाले असून लाखाच्यावर लोकांनी हा व्हिडीओ बघितला आहे.
 
 
 
किंग खानच्या चाहत्यांना, हा चित्रपट एक म्हणजे एक मेजवानीच ठरणार आहे. कारण, "हम जिसके पिछे लग जाते हैं, लाईफ बना देते हैं!" असं म्हणत ५'८'' फुटी शाहरुख चक्क बुटका बनून आपल्या समोर येतो. या चित्रपटात तो पागल, आशिक, शायर, मेंटल, दिलदार असे अनेक पैलू घेऊन आपल्यासमोर येणार आहे. परंतु, त्याच्या या 'बुडक्या' पण, नवीन लूकमुळे त्याच्या चाहत्यांमध्ये अजून नवीन एक उत्सुकता लागून राहिली असेल यात काही शंका नाही.