विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग - ३२
 महा त भा  08-Sep-2017


 

अवंती: मेधाकाकू...सर्दी-पडसे आणि शिंकानी आज फारच बेजार झाल्ये मी. काही सुचत नाहीये, पण आपला अभ्यास चुकवायचा नाहीये मला...!!..यातूनही काही नवे मिळेल आज अशी खात्रीच आहे माझी.


मेधाकाकू: दिसतेच आहे मला, नाकाला रुमाल लाऊन ठेवलेला...!!..अवंती...आता पावसाळा संपत आलाय आणि तुला होणारा सर्दीचा त्रास हा हवामानातील बदलाचा परिणाम आहे हे समजून घे. अगदी खगोलशास्त्राचा आणि ऋतुमानाचा संदर्भ घ्यायचा झाला तर हि शरद ऋतूची सुरुवात आहे. साधारणपणे १५ सप्टेंबर ते १५ नोव्हेंबर हे दोन महिने म्हणजे पावसाळा संपून हिवाळा सुरु होण्याच्या मधला कालावधी म्हणायला हरकत नाही. आपल्या चतुर पूर्वजांनी याचाही संदर्भ म्हणी आणि वाकप्रचारात घेतला आहे. आपण ‘घर’ या संकल्पनेचा अभ्यास करतो आहोत आणि घरातल्या प्रत्येकाचे आरोग्य उत्तम असणे हे फार महत्वाचे असते. आणि उत्तम आरोग्य जोपासना म्हणजे कुटुंबाचा डॉक्टर आलाच.

या म्हणीनमधे काही शतकांपूर्वीचा संदर्भ आहे तो ‘वैद्याचा’. ‘वैद्य’ याच एका शब्दावरून; घरातील, समाजातील व्यक्तीचे स्वभाव, प्रवृत्ती, श्रद्धा यांचा नेमका उल्लेख या म्हणींमध्ये केला गेला आणि तो आजही आपल्याला मार्गदर्शक वाटेल इतका स्पष्ट आहे. आता ही म्हण फारच गमतीची वाटेल तुला....गम्मत अशासाठी कि यातून ते ‘वैद्य’ सुद्धा सुटले नाहीत. वैद्यांना शारदी माता. पावसाळ्यानंतर येणारा हा शरद ऋतू, वैद्यकीचा व्यवसाय करणार्याना खूप फायद्याचा असतो, जणूकाही माता-पित्यांचे आशिर्वाद स्वरूप, कारण या बदलत्या ऋतूमानात, घरातल्या सर्वांच्या आरोग्याचे छोटे-मोठे प्रश्न उभे रहातात आणि वैद्यांचा सल्ला घेऊनच योग्य उपचार होऊ शकतात. थोड्याशा सूक्ष्म उपरोधाने वापरल्या जाणार्या या म्हणीला ‘उपरोध’ किंवा ‘व्याजस्तुती’ अलंकाराचा स्पर्श झालेला आहे हे लक्षात येते. मराठी भाषा अलंकारांचा नव्याने अभ्यास मांडणार्या रा. अ. काळेले यांनी या अलंकाराला ‘दारुण’ असे संबोधन वापरले आहे. वैद्यबुवांचे रूपक अन्योक्ती स्वरूपात असे अनेक संदर्भ देते.


अवंती: मी फक्त अचंबित होऊ शकते, हे सगळं ऐकल्यावर, कारण ती कधीही न ऐकलेली हि म्हण आणि त्यावरचे तुझे अर्थसंस्कार आणि समजावणे हे फार विलक्षण आहे, मेधाकाकू...!!

मेधाकाकू: अवंती, आता याच वैद्यबुवाना हाताशी धरून श्रद्धाळू, भोळ्या आणि विवेकाची पारख नसलेल्या समाजाला उद्देशून एक म्हण कशी प्रचलित झाली ते पाहूया. वैद्याचे वाटले आणि सन्याशाचे मुंडले कोणास समजत नाही. रुग्णाची तपासणी करून रोगाची-व्याधीची परीक्षा झाल्यावर मूळ भारतीय वैद्यकी उपचार पद्धती मधे, वैद्य, छोट्या खलामधे काही जडीबुटी घालून तशाच छोट्या बत्त्याने त्या कुटतात आणि त्याची पुरचुंडी रुग्णाला दिली जाते त्या क्रियेला ‘वाटले’ किंवा ‘वाटण’ किंवा ‘चाटण’ असे संबोधन वापरले जाते. हे औषध काय आहे, ते कसे बनवले आहे याची कल्पना रुग्णाला किंवा त्याच्या नातेवाईकाना नसते, कारण वैद्य आणि त्याच्या उपचारांवर रुग्णाचा पूर्ण भरोसा असतो, असे म्हणीचा पहिले दोन शब्द खूप सकारात्मक आहेत. पुढच्या अर्ध्या वाक्यात ‘सन्याशाचे मुंडले’ याचा ध्वनित अर्थ पूर्ण नकारात्मक आणि उपरोधिक आहे. तीर्थयात्रेला गेल्या नंतर, मुंडले करून घेणे याचे दोन अर्थ होतात. पहिला अर्थ तीर्थक्षेत्री गेल्यावर केसांचा त्याग करून, मुंडण करून सन्यास घेणे. मात्र या म्हणीत दुसरा अर्थ अभिप्रेत आहे. देवभोळ्या यात्रेकरूला एखाद्या ढोंगी संन्याशी भेटतो आणि तो फसवला जातो-लुबाडला जातो, त्याचे पैसे-कपडे हा ढोंगी संन्याशी, देवाधर्माच्या नावाने काढून घेतो यालाच ‘संन्याशाचे मुंडणे’ किंवा ‘सन्याशाने मुंडणे’ असे म्हटले जाते. म्हणीचा हा पुढचा अर्धा भाग नकारात्मक संदर्भाचा असला तरी योग्य ती जागरूकता हि म्हण अनेक शतके निर्माण करते आहे.एकाच म्हणीत ज्या अलंकारांत शब्द आणि अर्थ या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात, त्या अलंकारांस ‘उभयालंकार’ असे म्हणतात. एकाच अर्थाचे वाटणारे दोन शब्द किंवा भावार्थ एकाच अर्थाने वापरले आहेत, असा आभास काही वेळा निर्माण होतो. वस्तुतः ते शब्द भिन्न अर्थांनी वापरलेले असतात आणि हे ध्यानात आल्यावर एक प्रकारच्या चमत्कृतीचा अनुभव येतो, जसे या म्हणीत एक भाव सकारात्मक आहे तर दुसरा भाव नकारात्मक.


अवंती: एकदम सही आहे मेधाकाकू...आज खूप सर्दी झाल्ये त्यामुळे बोलता येत नाहीये हे खरे असले तरी आज जे ऐकलंय ते मी फक्त समजून घेत्ये, त्यावर मी काही बोलावे असे नाहीये माझ्याकडे.


मेधाकाकू: अवंती...फक्त उपहास किंवा विरोधाभास निर्माण करणे इतकेच काम या म्हणी किंवा वाकप्रचार करून थांबत नाहीत तर त्या व्यक्तीच्या स्वाभाविक वैशिष्ट्यावर नेमकी टिप्पणी सुद्धा करतात. स्वभावाचे असे यथार्थ वैशिष्ट्यपूर्ण वर्णन करणारा हा या वाकप्र चाराचा ‘स्वभावोक्ती’ अलंकार पाहूया. एका वेगळ्या बोलीमध्ये हि म्हण कशी रंगतदार वाटते बघूया... रुचणें रुचचें, पचचें, पायलीभर वेंचचें, सुखें निद्रायेचें, कामाचें ओडणें, सांगरे वैद्या माझ्या रोगाची भावना. हि एक सुखवस्तू कुटुंबातील हि थोडीशी वृद्धत्वाकडे झुकलेली गृहिणी असावी बहुधा...!!..हि गृहिणी इतरांसारखी कुटुंब सौख्याच्या छोट्या छोट्या गोष्टीत रमणारी नाही कारण सगळी सुखं मिळून सुद्धा ती समाधानी नसावी. वैद्याला निदान करायला सांगताना हिची तक्रार कशी बोलकी आहे बघ अवंती...!!..ती म्हणत्ये...” मला रुचणारेच निवडक पदार्थ मी भरपूर आवडीने खाते आणि मला ते पचते सुद्धा कारण मला छान झोपही लागते, मात्र मला घरातली कामे काही उरकत नाहीत, तर आता तुम्हीच मला काय व्याधी आहेत ते सांगावे”. एका तक्रारबाज आणि थोड्याशा कांगावखोर सासूबाईचे यथार्थ वर्णन, या ‘स्वभावोक्ती’ अलंकारयुक्त वाकप्रचारात केले असावे.


अवंती: आता या वैद्यबुवांच्या उपचाराने, माझी सर्दी बहुतेक पळून गेलेली दिसत्ये...!!..मेधाकाकू...मस्त-मस्त आजचा अभ्यास...!!

- अरुण फडके.