रामरहीमच्या डेरा गुफामध्ये आढळून आले २ अल्पवयीन मुले
 महा त भा  08-Sep-2017

दोन खोल्याभरून रोकड जप्त

 

सिरसा (हरियाणा) : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख तथाकथित धर्मगुरू बाबा राम रहीम यांच्या डेरा गुफाची आज सुरक्षा पथकाद्वारे झडती घेण्यात आली, त्यात २ अल्पवयीन मुलांसह ५ जण आढळून आले आहेत. त्याचबरोबर दोन खोल्याभरून रोकड जप्त करण्यात आली आहे.

 

सिरसा येथील डेरा मुख्यालयाची झडती घेण्यासाठीचे आदेश पंजाब - हरियाणा उच्च न्यायालयातर्फे देण्यात आले होते. हरियाणा सरकारकडून एका अधिकाऱ्याच्या उपस्थितीत डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात ही शोधमोहिम करण्याची परवानगी न्यायालयात मागण्यात आली होती. त्याला न्यायालयानेही मंजूरी दिली होती. त्यानुसार आज उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एकेएस पवार मुख्यालयात दाखल झाले असून झडतीला सुरूवात कऱण्यात आली.

 

अद्यापही झडती सुरु आहे, अनेक खोल्यांचा शोध सुरु आहे. झडती घेण्यासाठी ४१ निमलष्करी दल, ४ लष्करी दल, ४ जिल्हायांचे पोलीस पथक आणि १ श्वान पथक तैनात करण्यात आले आहे. याशिवाय स्वाट(Special Weapons and Tactics) टीमही तेथे दाखल झाली आहे.

 


४ सप्टेंबर रोजी डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयातून पोलिसांनी शेकडो शस्त्रास्त्रे जप्त केली होती. प्रशासनाकडून शस्त्रे पोलिसांच्या हवाली करण्याचे आदेश यापूर्वीच दिले होते मात्र तरी देखील डेरा प्रशासनाने शस्त्रे पोलिसांच्या स्वाधीन केली नव्हती. या शस्त्रांमध्ये शेकडो बंदुका सापडल्या आहेत. त्यापैकी परवाना असलेल्या ३० बंदुका डेरा सच्चा सौदा प्रशासनाने यापूर्वीच पोलिसांच्या स्वाधीन केल्या आहेत. मात्र डेरा जवळ किमान ६७ परवाना असलेल्या आणखी बंदुका असल्याची माहिती पोलिसांकडे आहे.