पंतप्रधान मोदी घेणार आंग सान सुकी यांची भेट
 महा त भा  06-Sep-2017


नेपिडो (म्यानमार) : दोन दिवसीय म्यानमार दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज म्यानमारच्या स्टेट कॉन्सिलर आंग सान सुकी यांची भेट घेणार आहेत. या भेटी दरम्यान दोन्ही देशांमध्ये काही महत्त्वपूर्ण स्वाक्षऱ्या देखील करण्यात येणार आहेत. यानंतर म्यानमारमधील भारतीय नागरिकांची भेट घेणार असून त्यानंतर पंतप्रधान मोदी उद्या मायदेशी परत येणार आहेत.


पंतप्रधान मोदी यांचा हा पहिलाच अधिकृत म्यानमार दौरा आहे. या अगोदर २०१४ मध्ये मोदी हे म्यानमारला गेले होते, परंतु त्यावेळी म्यानमारमध्ये आयोजित आशियान देशांच्या बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी ते गेले होते. तसेच दोन्ही देशांमध्ये परस्पर संबंधांवर त्यावेळी कसलीही चर्चा झाली नव्हती. त्यामुळे दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंध वाढवणे आणि द्विपक्षीय चर्चेच्या दृष्टीने मोदी यांची ही पहिलीच म्यानमार भेट आहे.


या भेटी सागरी सुरक्षा, व्यापार, सांस्कृतिक, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रांमध्ये काही महत्त्वपूर्ण करार होण्याची शक्यता आहे. म्यानमारच्या स्थानिक वेळेनुसार आज दुपारी मोदी आंग सान सुकी यांची भेटी घेणार आहेत. याभेटीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये विविध विषयांवर चर्चे होणार आहे. यानंतर दोन्ही नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद होऊन करारांवर स्वाक्षऱ्या केल्या जातील.


आपल्या या दोन दिवसीय दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदी म्यानमारमधील काही ऐतिहासिक स्थळांना आणि म्यानमारमधील प्रसिद्ध हिंदू मंदिरांना भेटी देणार आहेत. म्यानमारमध्ये विविध प्रकल्पांमध्ये काम करत असलेल्या भारतीय कंपन्यांचे अधिकारी तसेच म्यानमारमध्ये राहत असलेल्या भारतीय नागरिकांचे देखील ते भेट घेणार आहे. म्यानमारचे स्वातंत्र्यसैनिक आंग सान यांच्या समाधीस्थळाला देखील मोदी भेट देणार आहेत. यानंतर उद्या ते भारतात परत येतील.