'अगले बरस तू जल्दी आ' म्हणत देशभरात बाप्पाचे विसर्जन
 महा त भा  05-Sep-2017

भावपूर्ण वातावरणात देशभरात बाप्पाला निरोप

१२ दिवसांचा पाहुणचार घेतल्यानंतर देशभरातील भाविकांनी आज आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. मुंबई, पुण्यासह संपूर्ण देशभरात वाजत गाजत मोठमोठ्या मिरवणुकासह सार्वजनिक मंडळातील बाप्पांना भाविकांनी निरोप दिला.

महाराष्ट्रसह गुजरात, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू काही ठिकाणी आज सकाळपासूनच बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली होती. सकाळपासूनच बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांची लगबग सुरु झाली होती. 'गणपती बाप्पा मोरया', 'अगले बरस तू जल्दी आ' अशा घोषणा आणि गुलालाची मुक्तहस्ते उधळण करत विविध शहरातील रस्ते भाविक आणि बालचमूंनी फुलून निघाले होते. 


आंध्र प्रदेश - हैदराबाद मध्ये आज सकाळ पासून बाप्पांच्या मिरवणुकांना सुरुवात झाली होती. विसर्जन मिरवणुकी दरम्यान कसल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच वाहतुकीची विशेष व्यवस्था देखील करण्यात आली होती. हैदराबादमधील प्रसिद्ध खैरताबाद येथील बाप्पांला तब्बल दहा तासांच्या विसर्जन मिरवणुकीनंतर काल संध्याकाळी निरोप देण्यात आला. प्रत्येक वर्षी होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन यंदा मंडळाने विसर्जन मिरवणुकीला सकाळी ७ वाजल्यापासूनच सुरुवात केली होती. तसेच ५७ फुट उंचीच्या बाप्पाच्या या भव्य मूर्तीच्या दर्शनासाठी भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड गर्दी केली होती.
गुजरात - गुजरातची राजधानी असलेल्या गांधीनगरसह सुरतमध्ये आज सकाळपासूनच बाप्पांच्या विसर्जनाला सुरुवात झाली होती. अनेक ठिकाणी वाजत गाजत आणि गुलालाची उधळणमध्ये नागरिकांनी नैसर्गिक जलाशयांमध्ये बाप्पांना अखेरचा निरोप दिला. यंदा राज्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पर्यावरणपूरक मूर्तींची स्थापना करून प्रशासनाकडून तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावात घरगुती बाप्पांना निरोप दिला.तामिळनाडू - तामिळनाडूतील विविध ठिकाणी बाप्पांना भावपूर्ण वातावरणामध्ये निरोप दिला. चेन्नईच्या किनारपट्टीवर आज सकाळपासूनच घरगुती बाप्पांच्या विसर्जनाला सुरुवात झाली. आई बाबांच्या जोडीने अनेक लहान मुले आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी विसर्जन स्थळी आले होते.