गुगलकडून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा
 महा त भा  05-Sep-2017

 

आज ५ सप्टेंबर म्हणजेच देशाचे पहिले उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस त्यामुळे आजचा दिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त गुगलने त्यांच्या नेहमीच्या अंदाजात भारतीयांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आज गुगलने डूडलच्या माध्यमातून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

भारताचे दुसरे राष्ट्रपती होण्याचा मान देखील सर्वपल्ली राधाकृष्णन यांना मिळाला होता. ते महान शिक्षकतज्ञ म्हणून ओळखले जात असल्याने त्यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. १९५४ मध्ये त्यांना भारतरत्न या देशातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

 

त्यांच्या बुद्धीची कीर्ती परदेशात देखील नावाजलेली होती. भारतीय तत्त्वज्ञानाचे भाष्यकार म्हणून ते ऑक्सफर्डमध्ये नावाजले गेले होते. त्यांच्या कार्याचे महत्व जाणून ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्याच्या नावाने ‘राधाकृष्णन मेमोरियल बिक्वेस्ट’ हा पुरस्कार ठेवला आहे. ब्रिटीश काळातील भारताचे महत्वाचे विचारवंत म्हणून देखील त्यांना ओळखले जात होते.