​कंपनी नियम उल्लघंन प्रकरणी २ लाखांहून अधिक कंपन्यांची बँक खाती बंद
 महा त भा  05-Sep-2017


 

नवी दिल्ली : केंद्र सरकारने कंपनी अधिनियमाचे उल्लंघन करणाऱ्या २ लाख ९ हजार ३२ कंपन्यांवर कलम २४८(५) अन्वये कारवाई केली आहे. शासकीय आदेशाने केलेल्या या कारवाईने संबंधित कंपन्यांना बँकेद्वारे आर्थिक व्यवहार करण्यावर मनाई करण्यात आली आहे. यामुळे धनादेशाद्वारे करण्यात येणारे अधिकार आणि स्वाक्षरीचे अधिकारही या कंपन्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून काढून घेण्यात येत असल्याचे या आदेशामध्ये शासनाने म्हटले आहे.

या कंपन्यांची बँक खाती गोठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अर्थ मंत्रायलाने केलेल्या या कारवाईत भारतीय बँक संघद्वारे कारवाई झालेल्या कंपन्यांच्या खात्यांद्वारे होणारे व्यवहार रोखण्याचे तातडीचे आदेश देण्यात आले आहेत. शासनाच्या संकेतस्थळावर या कंपन्यांची सूची प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या कंपन्यांनी अशी कोणती चूक केली?

कॉर्पोरेट कार्य मंत्रालयाने संकेतस्थळावर सक्रिय असलेल्या कंपन्यांची यादी प्रसिद्ध केलेली असते. यामधील सर्व कंपन्यांनी आपले एका आर्थिक वर्षातील व्यवहार आणि कर्ज, अपेक्षित वित्तीय विवरण इत्यादीविषयीची माहिती कॉर्पोरेट मंत्रालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे आवश्यक असते. आपल्या मालमत्ता-संबंधित विशेष शुल्कविषयक माहिती जाहीर न करणाऱ्या कंपन्यांवर संशयित म्हणून वित्त विभागाद्वारे बारकाईने लक्ष ठेवले जाते. आणि त्यांचे संशयास्पद व्यवहार तपासून मग या कंपन्यांवर योग्य ती कारवाई केली जाते. अशीच आपल्या व्यवहारांची माहिती नेमूद दिलेल्या वेळेत प्रसिद्ध न करणाऱ्या कंपन्यांवर कंपनी कायद्याचे पालन न केल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.