एकेक पाऊल- कॉलिन ओ'ब्रॅडी
 महा त भा  24-Sep-2017


"कमॉन कॉलिन, यु हॅव टू डू धिस!
डोन्ट गिव्ह अप!"

आजूबाजूला पहावं तिकडे बर्फच बर्फ पसरला होता. जीवघेणी चढ अंगावर येत होती. हवा विरळ झाली होती आणि श्वास घ्यायला त्रास होत होता. पुढे टाकावं लागणारं एकेक पाऊल कॉलिनला मैलासारखं वाटत होतं. शरीराने हात टेकले होते. तरीही आतून कुठेतरी स्वतः ला कॉलिन पुश करत होता.

"कमॉन, यु हॅव गॉट टू डू धिस!"

खिशात बाळगलेला एक छोटासा दगड कॉलिनने कसाबसा बाहेर काढला. कॉलिन हा दगड नेहमी स्वतः जवळ ठेवतो. एव्हरेस्ट असला म्हणून काय झालं, तोही हा अश्याच काही दगडांनी बनलेला आहे, ह्याची आठवण म्हणून. अश्याच एकेक दगडाला पार करत आपल्याला हे शिखर आज काहीही झालं तरी पार करायचंच आहे. शेवटचे काही मीटर्स. एक पाऊलही त्याला अशक्य झालंय.

"नो मॅन, नाही! असं करून चालणार नाही!" पुन्हा एक पाऊल.

एकेक पाऊल टाकता टाकता त्याला काही वर्षांपूर्वीच्या घटनांची आठवण झाली. जानेवारी २००७. नुकताच कॉलेजमधून बाहेर पडलेला कॉलिन जग फिरायला निघाला होता. थायलंडला एका समुद्र किनाऱ्यावर पेटलेल्या दोरांवर एक लोकल खेळ खेळताना तो दोर त्याच्या पायात गुंतला. पाय भाजायला लागल्यावर त्याने धावत जाऊन जवळच्या समुद्रात उडी मारली. पायांना लागलेली आग विझली पण तो जवळपास २५% भाजला. दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीच्या जखमा त्याच्या पायाला झाल्या होत्या. साधारण आठेक शस्त्रक्रिया त्याच्या पायावर झाल्या. त्याची आई पाच दिवसांनी थायलंडला पोहोचली. तो पर्यंत तो एकटाच उपचार घेत होता. कॉलिन आयुष्यात आता जेमतेमच चालू शकेल, असं डॉक्टरांनी जाहीर करून टाकलं. इतक्या गंभीर जखमा बघता धावणं किंवा अजून काही फारच लांबचं होतं.

त्याच्या डोळ्यासमोर क्षणभर काळोखीच आली. पण कॉलिनची आई त्याच्यामागे उभी राहिली. घरी गेल्यावर कॉलिनच्या व्हीलचेअरसमोर त्याच्या आईने एक खुर्ची ठेवली. कॉलिनला फक्त त्या खुर्चीकडे चालत जाऊन बसायचं होतं. अंतर होतं एक पाऊल! ह्या एका पावलासाठी कॉलिनने साडेतीन तास घेतले. पण त्याच्या आईने हार मानू दिली नाही. दुसऱ्या दिवशी खुर्चीचं अंतर पाच पावलं. तिसऱ्या दिवशी दहा. एकेक पाऊल करता करता कॉलिन चालायला लागला. आधी घरात, मग घराबाहेर. अगदी जॉगिंगसुद्धा जमलं. भाजल्यानंतर केवळ अठरा महिन्यात त्याने शिकागोला ट्रायथालॉनमध्ये भाग घेतला. नुसता भाग घेतला नाही तर ती जिंकलीसुद्धा!!


तेच एक पाऊल कॉलिन आज एव्हरेस्टच्या चढाईवर आठवत होता. एकेक करत त्या रात्री त्याने एव्हरेस्ट सर केलं!!


त्याचं एक टार्गेट पूर्ण झालं. बेस कॅम्पमध्ये येऊन विसावत महतकष्टाने बूट काढत असताना त्याला त्याच्या मैत्रिणीचा जेनीचा फोन आला "तुझ्या हातात जास्त वेळ नाहीये, काठमांडुहून दुबईसाठी फ्लाईट बुक झालं आहे, तिथून पुढे अलास्का, तयारीला लाग."


कॉलिन अलास्काला पोहोचला आणि देनाली उत्तर अमेरिकेतील सर्वात उंच पर्वत शिखराच्या चढाईला सुरवात झाली. एव्हरेस्ट शिखर काबीज केल्यावर केवळ चार दिवसांच्या अंतरात त्याने देनालीच्या मोहिमेला सुरवात केली होती. देनाली देखील सर झालं. कॉलिनने दोन विश्वविक्रमांवर आपलं नाव कोरलं. उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव आणि एव्हरेस्ट हे जगाचे तिन्ही पोल्स कमीतकमी म्हणजे १३१ दिवसांत त्याने पार केले. हा पहिला विक्रम आणि सातही खंडातील सर्वोच्च शिखरं आणि त्याबरोबर दोन्ही ध्रुव हा 'एक्सप्लोरर्स समिट' हे चॅलेंज केवळ १३९ दिवसांत पूर्ण केलं. हा दुसरा विक्रम. ह्या आधीचा साडेसहा महिन्यांचा विक्रम त्याने फक्त साडेचार महिन्याचा वेळ घेऊन मोडला.


शिकागो मॅरेथॉन जिंकल्यावर कॉलिनने मागे वळून बघितलंच नाही. पन्नासेक ट्रायथलॉन्स, जपानमध्ये आयरन मॅन, थ्री पोल्स चॅलेंज, सेव्हन समिट्स चॅलेंज- कॉलिनने धडकाच लावला. २५% भाजून निघाल्यावर पुन्हा कधीही धड चालू देखील शकणार नाही असं डॉक्टरांनी ज्याच्याबद्दल सांगितलं तो हाच का? हा प्रश्न पडावा इतकी दुर्दम्य इच्छाशक्ती त्याच्याकडे होती. परिस्थितीसमोर हात टेकायचे नाहीत, हे त्याच्या डोक्यात घट्ट बसलं होतं.

कॉलिन ओ'ब्रॅडी. एकदम अपरिचित नाव. वय आजच्या तारखेला फक्त ३२ वर्ष आहे. पण ज्या अवघड स्थितीतून सावरून त्याने जे काही विश्वविक्रम केले आहेत, त्याबद्दल खरंतर कॉलिनच्या नावाआधी 'द' ही उपाधी लावायला हवी. तो नुसता कॉलिन ओ'ब्रॅडी नाही तर तो 'द कॉलिन ओ'ब्रॅडी' असायला हवा.

लेजेन्ड्स हे प्रत्येक पिढीत जन्माला येत असतात. मात्र बऱ्याचदा त्यांचा परिचय त्या पिढीला होत नाही. किंवा त्या त्या लोकांचं कर्तृत्व त्यांना लेजेंड ह्या कॅटेगरीमध्ये त्यांना नेऊन ठेवणार असतं ह्याची जाणीव आपल्याला नसते. अशी माणसं कर्तृत्वाची एकेक शिखरं गाठत जातात आणि इतिहासाच्या पानावर प्रत्येक पावलासोबत आपलं नाव अधिकाधिक ठळक करत जातात.

कॉलिन हाही एक लेजेंडच.

यशासाठीचा प्रत्येक राजमार्ग एका पावलाने चालू होतो. त्यापुढे फक्त एकच पाऊल टाकायचं असतं. रोजचं एक, ठरवलेलं, आखलेलं. ते न चुकता केलं की, एव्हरेस्टदेखील सर होतं. कॉलिनच्या प्रवासातून मिळालेला हा एक संदेश!

Embeded Object

हॅट्स ऑफ कॉलिन !

 

- सारंग लेले, आगाशी.