सामान्य महिलेला असामान्य फॅशन डिझायनर बनविणारी मानसी कोयंडे
 महा त भा  21-Sep-2017

 
 
 
कालपासून घटस्थापना झाली. घरांमधून, सार्वजनिक ठिकाणी देवीची प्रतिष्ठापना केली गेली. नऊ दिवस व नऊ रात्री या आता देवीच्या भक्तिमय वातावरणाने मंत्रमुग्ध होऊन जातील. आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीने महिलांना देवीचा दर्जा दिला आहे. ती माया-ममता-शक्ती-भक्तीचे रूप आहे, असे आपली संस्कृती म्हणते. कदाचित जगभरात स्त्रीला देवीचा उच्च दर्जा देणार्‍या मोजक्या संस्कृतींपैकी आपली एक संस्कृती असावी. मात्र, त्याच वेळी हुंडाबळी, लैंगिक शोषण, बलात्कार, घरगुती हिंसा या प्रकारांनी स्त्रियांवर अत्याचारदेखील होत आहेत. एकीकडे आपण देवीला पूजतो, मात्र दुसरीकडे तिच्या प्रारूपाला गर्भातच ठेचले जाते. स्त्री कुठेही सुरक्षित नाही, हे तितकंच सत्य आहे. आपल्या अलीकडील पुरुषप्रधान संस्कृतीने तिला पूर्णत: अबला करून टाकलं आहे. मात्र, या अबलेला जेव्हा-केव्हा संधी मिळाली तेव्हा आपल्या सबलतेचा तिने पुरावाच जणू दिला आहे. जिजाऊ माता, झाशीची राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी, मेरी कोमही त्यापैकी काही उत्तमउदाहरणं...

तिने देखील अशाच काही हताश आणि असाहाय्य झालेल्या महिलांना पाहिलं आहे. त्यांना त्यांच्या पायावर मोठ्ठं करण्याचं स्वप्न ती पाहत आहे. ही स्वप्न पाहणारी ‘ती’ म्हणजे कोयंडेज इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन स्टडीजची संचालिका मानसी देवीदास कोयंडे.

माझगाव येथे राहणारे दशरथ कबाडी एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल आगारात कार मेकॅनिक म्हणून कार्यरत होते. त्यांना २ मुले आणि २ मुली होत्या. माया ही त्यातलं शेंडेफळ. भावंडात जरी शेवटचा नंबर असला तरीही अभ्यासात मात्र माया नेहमीच पुढे असे. ग्रँटरोडच्या सेवा सदन शाळेत मायाचं शालेय पूर्ण झालं. पुढे बी. कॉम. आणि त्यानंतर सनदी लेखापाल अभ्यासक्रमाची काही वर्षे असं मायाचं एकूण शिक्षण. १९९९ दरम्यान मायाचं लग्न देवीदास कोयंडे यांच्यासोबत झालं आणि माया दशरथ कबाडी, मानसी देवीदास कोयंडे बनली. खरंतर नाव बदलण्याच्या या प्रक्रियेला तिचा विरोध होता. मात्र, तिने रामासंदर्भात एक पुस्तक वाचलं होतं. त्यात लिहिलं होतं, बदल हा अपरिहार्य आहे. देवीदास कोयंडे यांनी नायगाव येथून टीचर ट्रेनिंग प्रोग्रामहा टेलरिंग इन्स्ट्रक्टरचा अभ्यासक्रमपूर्ण केला होता. त्यानंतर १९९१ साली या तरुणाने अवघ्या ६ मशीनसह शिवडी येथे टेलरिंग इन्स्टिट्यूट सुरू केलं. आता हे इन्स्टिट्यूट मोठ्ठं करण्याचं ध्येय या कोयंडे दाम्पत्याने आपलंसं केलं होतं.

 शिवडीच्या बैठ्या चाळीतून मानसीने उत्तुंग भरारीची स्वप्ने पाहिली. त्यातलं पहिलं स्वप्न होतं, स्वत:च्या मालकीचं इन्स्टिट्यूट. प्रचंड मेहनतीच्या जोरावर सन २००० साली कोयंडे दाम्पत्याने नेरुळ येथे सुरुवातीला भाड्याने आणि सहा महिन्यांतच स्वत:च्या जागेवर इन्स्टिट्यूट सुरू केलं. दरम्यान मानसी कोयंडे यांनी २००८ मध्ये ‘ऍडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी इन फॅशन डिझायनिंग’ हा दोन वर्षांचा अभ्यासक्रमएका नावाजलेल्या संस्थेतून पूर्ण केला. फॅशन डिझायनिंगच्या कक्षा या ज्ञानामुळे रुंदावल्या. २०११ साली त्यांनी फॅशन डिझायनिंगच्या पहिल्या बॅचला स्वतंत्ररित्या शिकवलं. इथेच ‘कोयंडेज इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन स्टडीज’ची मुहूर्तमेढ रोवली गेली.

 गेल्या १७ वर्षांत कोयंडे दाम्पत्याने २० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना फॅशन डिझायनिंग आणि शिवणकामाचे धडे दिले आहेत. त्यातील २५ विद्यार्थ्यांनी स्वत:चा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला आहे, तर अनेक विद्यार्थी घरातून स्वतंत्र व्यवसाय करत आहेत. विशेष म्हणजे, हे २५ विद्यार्थी महिला आहेत. २०१५ साली मानसी कोयंडे यांनी सखोल संशोधन करून ’कट टू स्टीच’ नावाचं स्वत:चं उत्पादन सुरू केलं आहे. ५ विविध ड्रेसचे डिझाईन या उत्पादनांतर्गत घरपोच मिळते. ते ट्रेसिंग पेपरवर उमटवून त्या आकाराचे कपडे कापून घ्यायचे आणि आपला ड्रेस तयार. अशी सहज, सुलभ ही संकल्पना आहे. कोणत्याही शिवणकामकरणार्‍या व्यक्तीला एखाद्या फॅशन डिझायनरसारखा ड्रेस शिवणे आता सहज शक्य आहे. फॅशन डिझायनिंग म्हणजे उच्चभ्रू वर्गाची मक्तेदारी, हा जो समज आहे त्यास छेद देऊन फॅशन डिझायनिंग समाजाभिमुख करण्याचा मानसी कोयंडे आणि त्यांच्या पतींचा मानस आहे. आज त्यांच्याकडे एमबीए झालेले, आयटी, मॅनेजमेंटमध्ये उच्च पदव्या मिळवलेले विद्यार्थी देखील येतात. त्यांना त्यांच्या कामात कुठेतरी खिन्नता आलेली असते. कुठेतरी ते थांबलेले असतात. मानसी कोयंडे त्यांना त्यांच्या मानसिक स्थितीतून बाहेर काढून योग्य ते मार्गदर्शन करतात. एकप्रकारे त्या मानसोपचार करतात, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. फॅशन डिझायनिंग हा कोयंडे दाम्पत्यासाठी फक्त एक व्यवसाय नसून ती चळवळ आहे. ही चळवळ त्यांना समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत न्यायची आहे.
 
लग्नानंतर अनेक महिला मानसिकदृष्ट्या हतबल होतात. लग्नाअगोदर करिअरच्या दृष्टीने असलेला त्यांचा उत्साह हा लग्नानंतर पूर्णत: मावळलेला असतो. मानसी कोयंडेंना अशा महिलांच्या मनाला उभारी देऊन त्यांना करिअरसाठी पुन्हा प्रेरणा द्यायची आहे. आपल्यासोबतच इतर महिलांनीदेखील श्रीमंत व्हावे यासाठी त्यांनी ’चारचौघी’ नावाची संकल्पना सुरू केली आहे. या संकल्पनेअंतर्गत २ महिला दुकान सांभाळतील तर उरलेल्या दोन विपणन आणि वितरणाची जबाबदारी पार पाडतील. हे करिअर मॉडेल हळूहळू संपूर्ण देशात पोहोचवायचे आहे. ’चूल अन मूल’ ही संकल्पना आता मागे पडली आहे. तुमच्यात जिद्द असेल तर तुमच्यासाठी या जगात काहीही अशक्य नाही. योजनाबद्ध आराखडा, वचनबद्धता आणि शिस्त या जोरावर मानसी कोयंडेंनी हा पल्ला गाठलाय. मानसी कोयंडेसारख्या समाजातील दुर्गा जर सर्वदूर पोहोचल्या तर समाजातील महिला निश्चितच गरुडभरारी घेतील, यात शंका नाही.
 
-प्रमोद सावंत