वास्तवदर्शी कवितांची शब्द‘लक्ष्मी’
 महा त भा  21-Sep-2017


आयुष्य अवघे, एक उतरंड


देवघेव सारी, बाकी मांडामांड


तसे असो नसो, काही आसपास


आपले आपणा, पुरताती श्वास जन्माचा सांगाती, श्वासच एकला


लयीवर त्याच्या झुले, जन्मझुला!!


माणसाच्या आयुष्यात श्वास खूप महत्त्वाचा असतो. त्याच्याच लयीवर जन्मझुला झुलत असतो. या झुल्यावर एकीकडे जन्म, तर दुसरीकडे मरण... असे सहजसोप्या भाषेत जीवनामध्ये श्वासाची महती अधोरेखित करणार्‍या या कवितेचे कवी आहेत लक्ष्मीकांत सखाराम तांबोळी. त्यांचा जन्म दि. २१ सप्टेंबर १९३९ साली महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील देगलूर या गावी झाला. पेशाने तांबोळी मराठीचे प्राध्यापक. देगलूर महाविद्यालयात प्राध्यापक व नंतर प्राचार्य म्हणून त्यांची कारकीर्द यशस्वी राहिली. एक आदर्श शिक्षक, विद्यार्थीप्रिय प्राध्यापक असा त्यांचा सर्वत्र लौकिक. २१व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. आपल्या आयुष्यात जे जे काही बरे-वाईट अनुभवले ते तांबोळी यांनी काव्यपंक्तीतून प्रसूत केले. ’अस्वस्थ सूर्यास्त’ हा त्यांचा सर्वाधिक गाजलेला कवितासंग्रह. या कवितासंग्रहात त्यांनी समाजाशी असलेले नाते आणि त्यांच्यातील गुंतागुंत यांचा योग्य पद्धतीने संग्रह केला. प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी हे उत्तम कवी, तसेच उत्तमलेखकही. ‘हुंकार’ (१९५९), ‘तवंग’ (१९६८), ‘दूर गेलेले घर’ (१९७०), ‘कृष्णकमळ’ (१९७२), ‘अंबा’ (१९७८), ‘गंधकाली’ (१९७९), ‘सलाम साब’ (१९८१), ‘मी धात्री मी धरित्री’ (१९९१), ‘काव्यवृत्ती आणि प्रवृत्ती’ (१९९३), ‘कबिराचा शेला’ (१९९६) ही त्यांची काही निवडक प्रकाशित पुस्तके. त्यापैकी तवंग आणि सलाम साब हे कथासंग्रह असून त्यातील बहुसंख्य कथा तृतीयपुरुषी निवेदनातून येतात. ’सलाम साब’ हा जरा वेगळ्या धाटणीचा संग्रह आहे. यामध्ये जीवन हे कधीच सरळ, सहज, सोपे नसते. त्यात प्रत्येक क्षणाला, प्रत्येक दिवशी तिखट, गोड, आंबट अनुभव वाढून ठेवलेले असतात. हे वाचकांच्या समोर मांडण्याचा तांबोळी यांनी केलेला प्रयत्न वाखाणण्यासारखा आहे.

आजवर राखले इमान शब्दांशी,


तर माणसे बैमान झाली, आता राखतो आहे इमान माणसांशी,


तर शब्द बैमान झाले!

ही ’इमान’ नावाची कविता ’मी धात्री मी धरित्री’ या त्यांच्या कवितासंग्रहातील असून अवघ्या चारच वाक्यांमध्येच तांबोळी अगदी सहज अभिव्यक्त होतात. काव्यनिर्मितीत महत्त्वाचे असते ते कमीतकमी शब्दांत खूप काही सांगून जाणे आणि वरील ‘इमान’ या तांबोळी यांच्या कवितेतून त्यांना ते अगदी चपखलपणे जमते, असे म्हणणे गैर ठरणार नाही. तांबोळी यांना मराठवाड्याचे विशेष आकर्षण. त्यांच्या ’दूर गेलेले घर’, ’कृष्णकमळ’ या कविता व कथासंग्रहातून ते जास्त जाणवते. लक्ष्मीकांत तांबोळी यांना ’सेलूचा स्वातंत्र्यसैनिक विनायकराव चारठाणकर पुरस्कार’ (१९९५), अंकुर साहित्य संघ अकोला यांचा ’अक्षर तपस्वी पुरस्कार’ (२००५) या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांना त्यांच्या पुढील काव्यमय वाटचालींसाठी खूप सार्‍या शुभेच्छा!

-पूजा सराफ