प्रार्थना बेहरेचा 'अनान' समलिंगी संबंधावर भाष्य करू पाहतोय का..? 
 महा त भा  18-Sep-2017
 

 
सध्या मराठी चित्रपटही हिंदी प्रमाणेच काही प्रमाणात का होईना बोल्ड होताना दिसत आहेत. 'नो एन्ट्री-पुढे धोका आहे', 'पुणे-५२' यांसारख्या चित्रपटांनंतर आता 'अनान' नावाचा एक नवा चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होतोय. या चित्रपटाचा ट्रेलर आज सोशल मीडियावरून प्रसिद्ध झाला असून तो चर्चेचा विषय बनला आहे. प्रार्थना बेहरे यामध्ये प्रमुख भूमिकेत असून ट्रेलर मधील काही दृश्यातून हा चित्रपट समलिंगी संबंधावर भाष्य करू पाहतोय कि काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

वेगळ्या प्रेमाची गोष्ट सांगणारा 'अनान' अशीच या चित्रपटाची प्रसिद्धी केली जात आहे. मुळतः नृत्य हा या चित्रपटाचा प्रमुख विषय आहे, परंतु त्याभोवती दोन प्रेम कथा गुंफल्या गेल्या आहेत असे लक्षात येते. येत्या शुक्रवारी म्हणजेच २२ सप्टेंबरला 'अनान' च्या या वेगळ्या प्रेमाची गोष्ट प्रदर्शित होणार आहे. 
 

 
प्राजक्ता माळी, सुखदा देशपांडे-खांडकेकर, ओंकार शिंदे, सुयोग गोऱ्हे, शिल्पा तुळसकर, यतीन कार्येकर अशी मोठी फौज या चित्रपटातून आपल्याला दिसणार आहे. राजेश कुष्ठे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. भगवान शंकरावर नाट्य सादर करण्यासाठी क्रिस नावाची मुलगी परदेशातून भारतात येते व त्यानंतर तिची भेट युवराज व नीलशी होते. पुढे नक्की काय होतं हे चित्रपट बघितल्यावरच लक्षात येईल. 'अनान' हा खरंच वेगळ्या प्रेमाची गोष्ट सांगणारा चित्रपट आहे का, याचं उत्तर मिळवण्यासाठी शुक्रवारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.