जिल्ह्यात 'स्वच्छता हिच सेवा' मोहिमेची सुरुवात
 महा त भा  17-Sep-2017


अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या 'स्वच्छ भारत' अभियानाअंतर्गत जिल्ह्यात 'स्वच्छता हिच सेवा' या मोहिमाचा आज शुभारंभ करण्यात आला. पालकमंत्री रणजीत पाटील यांनी स्वतः शहरातील टिळक रोड येथील मंगलदास मार्केट परिसरात स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. पाटील यांनी स्वत: हातात झाडू घेऊन कचरा साफ केला तसेच जनतेने आपल्या परिसराबरोबरच शहर देखील स्वच्छ ठेवावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


निरोगी जीवनासाठी स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. माननीय पंतप्रधानांनी गेल्या तीन वर्षात स्वच्छ भारताचा संदेश दिला. त्यामुळे अकोला जिल्हा देखील दुर्गंधी मुक्त व्हावा, यासाठी हि मोहीम सुरु करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. ही मोहिम २ ऑक्टोबर पर्यंत राबवण्यात येणार असून आपला जिल्हा स्वच्छ करण्यासाठी प्रत्येकाने या मोहिमेत सहभागी होऊन स्वच्छतेचा संकल्प करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.


याच बरोबर मार्च २०१८ पर्यंत जिल्हा संपूर्णपणे उघड्यावर शौचापासून मुक्त करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. चांगल्या आरोग्यासाठी प्रत्येक घरात शौचालय असणे गरजेचे आहे. ज्यांच्याकडे शौचालय नाहीत, त्यांनी तात्काळ शौचालय बांधावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. लोकांनी देखील मोठया प्रमाणात स्वच्छता अभियानाच्या या चळवळीत सहभागी होऊन आपल्या घराप्रमाणेच आपला परिसर, आपले गाव, आपले शहर स्वच्छ ठेवावे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.