दिव्यांग विद्यार्थ्यांच्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री
 महा त भा  16-Sep-2017


पनवेल : ’’दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांना जगण्याचे नवे बळ प्राप्त व्हावे, याकरिता त्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री वीर वूमन फाऊंडेशनच्यावतीने पनवेलच्या गोखले सभागृहात गुरुवारी भरविण्यात आले होते. या उपक्रमाने दिव्यांग विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर आणि स्वावलंबी होण्याकरिता नक्कीच मदत होईल,’’ असा विश्वास फाऊंडेशनच्या अध्यक्षा अर्चना ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केला.

 

 वूमन फाऊंडेशनच्यावतीने विविध सामाजिक उपक्रमराबविण्यात येत असतात. त्याअंतर्गत सतीश हावरे दिव्यांग शाळेच्या विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्याकरिता प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने या शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांनी विविध वस्तू साकारल्या. यात दिवे, पणत्या तसेच शोभिवंत वस्तूंचा समावेश होता. यांची विक्री प्रदर्शनाच्या माध्यमातून करण्यात आली. यावेळी फाऊंडेशनच्या अध्यक्षा अर्चना ठाकूर, सीमा जैन, अर्चना सोनी, श्रुती जैन, पूनमजैन, नम्रता बांठिया, अलका मेहता, सिंजल जैन यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या प्रदर्शनाचा नागरिकांनी लाभ घेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव द्यावा, असे आवाहनही फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे.