सेंट जोसेफ शाळेच्या फी वाढीला स्थगिती
 महा त भा  16-Sep-2017


आ. प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील आंदोलन यशस्वी


पनवेल : आ. प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली नवीन पनवेलमधील सेंट जोसेफ शाळा प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात नुकताच धडक मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सेंट जोसेफ शाळेतील पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मोर्चापुढे शाळा व्यवस्थापन नमले असून, शासन निर्णय होईपर्यंत विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची वाढीव फी न घेण्याचा निर्णय रात्री उशिरा झालेल्या बैठकीत घेण्यात आला.


सेंट जोसेफमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजपचे असंख्य कार्यकर्ते, पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक आ. प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चात सहभागी झाले होते. दरम्यान, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धारही यावेळी आ. ठाकूर यांनी केला होता. सायंकाळी आ. ठाकूर यांच्या उपस्थितीत मनपा आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर चारुशीला घरत, गटनेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत शाळा व्यवस्थापनाशी चर्चा केली. रात्री उशिरा पार पडलेल्या बैठकीत शाळा व्यवस्थापनाने फी वाढीसंदर्भात शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे सांगत शासन निर्णय होईपर्यंत १५ हजार रुपये एकत्रित फी ऑनलाईन भरावी, असे सांगितले. जी फी आकारली जाणार आहे, त्याची माहिती देणारा फलकही आता शाळेच्या परिसरात लावण्यात येणार आहे.

वाहतूक फी संदर्भात मंगळवारी बैठक


या निर्णयाबरोबरच शाळेच्या वाहतुकीसंदर्भातील ताळेबंद मंगळवारी मनपाकडे सादर केला जाणार आहे. तोपर्यंत विद्यार्थ्यांकडून वाहतुकीसंदर्भात कोणतीही वाढीव फी आकारली जाणार नसल्याचेही व्यवस्थापनाने मान्य केले. यामुळे आता सर्वच पालकांचे लक्ष मंगळवारी होणार्‍या मनपाच्या बैठकीकडे लागले आहे. याचबरोबर या आंदोलनामुळे पालक आणि शिक्षकांमध्ये जो तणाव निर्माण झाला आहे, त्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणामहोऊ शकतो. यासाठी मनपाच्या शिक्षण विभागप्रमुख निशा वैदू या शाळेला भेट देऊन वातावरण पूर्ववत करण्याचा प्रयत्न करणार आहेत, असे मनपा आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी आंदोलनकर्त्यांपुढे जाहीर केले.


सेंट जोसेफ शाळेतील वाढीव फी संदर्भात आयुक्तांसमवेत घेण्यात आलेले निर्णय व्यवस्थापनाला बंधनकारक राहणार आहेत. जे निर्णय घेण्यात आलेत त्याची अंमलबजावणी करण्यात टाळाटाळ केली, तर ही शाळा बंद करण्याचा प्रस्ताव आयुक्तांच्या माध्यमातून सरकारला पाठवू. वाढीव फी भरण्यासाठी पालकांवर सक्ती केल्यास शाळा व्यवस्थापनाविरुद्ध पोलिसांत गुन्हेही दाखल केले जातील. हे आंदोलन १२ तासांपेक्षा अधिक काळ चालले, पण शेवट मात्र गोड झालेला आहे.
प्रशांत ठाकूर, आमदार