विस्मृतीत गेलेल्या म्हणी आणि वाकप्रचार भाग - ३३
 महा त भा  15-Sep-2017


 

 

मेधाकाकू : अवंती, गणेशोत्सव आनंदात साजरा झाला. गणेशभक्तीमध्ये तल्लीन झालेल्या समाजातील गणेशोत्सव मंडळाना आणि कुटुंबाना, बदलत्या काळातील -बदलत्या जीवनशैलीने निर्माण झालेल्या शहर नियोजनाच्या समस्यांची किती जाणीव आहे याची मला मात्र शंका आहे. या उत्सवादरम्यान आलेल्या पावसाने आपल्याला यातील त्रुटींची जाणीव नक्कीच करून दिली आहे, तरीही आपण यातून काहीच बोध घेत नाही असे सतत जाणवते आहे मला. असो आता सध्या सुरु असलेला आपल्या अभ्यासाकडे वळूया. आज, घरातल्या वाढत्या कुटुंबातल्या व्यक्तींच्या समस्या-प्रवृत्ती-मानसिकता, नव्या पिढीकडे पाहण्याचा दृष्टीकोन, तत्कालीन चतुर समाजाने यातून घेतलेला बोध, असा वेगळा संदर्भ देणाऱ्या या म्हणी पाहूया आपण.

 

सतरा सुईणी विणारणीचा नाश

कुटुंबात नव्या पिढीचे आगमन हा सगळ्याच कुटुंबांमधे मोठ्या उत्सुकतेचा विषय असतोच. एकत्र कुटुंब व्यवस्थेत, मोठ्या कुटुंबात तर दर वर्षी नव्या बाळांचे आगमन नक्कीच असे. वरच्या वाकप्राचारातसतरा सुईणी’ आणि विणारणीचा नाश’ (होणाऱ्या बाळाची आई) अशी दोन रूपके, कुटुंबात अयोग्य पध्दतीने घडणाऱ्या एका व्यवहारासाठी वापरली आहेत. सतरा सुईणी, म्हणजे घरातल्या लहान - थोर प्रत्येकाने, त्या होणाऱ्या बाळाच्या आणि त्या आईच्या काळजीपोटी काही स्वतंत्र योजना आखायच्या आणि एका दिवशी त्यावरून घरात मोठे वाद-विवाद व्हायचे. परिणामी, नक्की काय करायचंय ते समजत नसल्याने अवघडलेली बाळंतीण मोठ्या अडचणीतच सापडायची. आपल्या कुटुंबात प्रत्येकाने वेगळ्या मताने वागायचे ठरवल्यावर, शांत-सुखी कुटुंबात कसा गोंधळ निर्माण होऊ शकतो त्याची झलक या वाकप्रचारात मिळते.

अवंती : मेधाकाकू.. मला नक्की खात्री आहे की दुपटी आणि कपडे कोणी शिवायचे, मेथीचे आणि अळीवाचे लाडू कोणी, केंव्हा आणि किती करायचे, बाळाची अंगडी-टोपडी, बाळांचे नाव काय ठेवायचं या बद्दलच असणार सगळ्यांच्या वेगवेगळ्या योजना...!! 

 

मेधाकाकू : अगं अवंती, अगदी खरंय तुझे. येणाऱ्या बाळांचे फार कौतुक प्रत्येकाला आणि मग जिद्द लावली प्रत्येकाने की माझेच ऐका. की गोंधळ होणारच की.!! असाच गोंधळ.. बाई बाळंत झाली तरी सुरूच राहिला तर मात्र त्याचे परिणाम गंभीर होतात. ते असे, ती गंभीर परिस्थिती वर्णन करणारा हा वाकप्रचार सुद्धा तसा गंभीरच आहे. 

 

 

पोरचे पोर गेले आणि कातबोळाचे मागणे आले

घरातली सून आपल्या मुलाची बायको बाळंत झाल्यानंतर एक घटना घडते. बाळाला दुध पाजण्यासाठी सुनबाई फार उत्सुक असते. मात्र ‘पोराच्या पोराला’ म्हणजे जन्माला आलेल्या बाळाला आईचे दुध ओढायला त्रास होतो कारण आईला हवा तसा पान्हा येत नाही. अशावेळी तिच्या स्तनावर लावण्यासाठी औषध म्हणून कातबोळा मागवला जातो. पण इथे तर नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. असे असताना आईला दुध यावे म्हणून कोणी कातबोळा मागवला आहे आणि त्याचे पैसे द्या म्हणून वाण्याचा माणूस दारात उभा आहे. कुटुंबाचे हित आणि प्रत्येकाचे आरोग्य सांभाळताना योग्य निर्णय योग्यवेळीच घ्या, उशीर करू नका अन्यथा काही गंभीर घटना घडू शकते असा आणि इतकाच सल्ला, बीभत्स रसाचे दर्शन घडवणारा हा वाकप्रचार देत असतो.

अवंती : बापरे. मेधाकाकू... फारच जालीम आहे हा सल्ला... मात्र निर्णय योग्य निर्णय योग्य वेळीच घ्यायला हवा हे मात्र पटले मला आणि ऐकताना मला घामही फुटला...!   

मेधाकाकू : अवंती... नवजात बाळाचा मृत्यू होऊ नये म्हणून दिलेला या वाक्प्रचारातला सावधानतेचा इशारा अनेक गोष्टींसाठी लागू पडतो, हे प्रत्येकाने लक्षात ठेवायाला हवाच. ही नव्या पिढीतली मुल-मुली आता मोठी झाली याची जाणीव देणाऱ्या म्हणी आणि वाकप्रचार सुद्धा याच समाजात प्रचलित झाले.    

 

 

येतील वांग तर फेडतील पांग

किशोरवयातून कुमारवयांत येताना, मुला-मुलींच्या शरीर व्यवहारांत निसर्गात: निश्चित फरक होत असतो. प्रत्येक कुमार-कुमारिकेच्या चेहेऱ्यावर वांग (तारुण्यपिटीका) उमटले की या शरीर व्यवहारातला दर्शनी फरक दिसतो आई वडिलांना आणि मुले वयात आल्याची चाहूल कुटुंबातल्या मोठ्यांना लागते. आता मुले मोठी झाल्येत, शिकून-सावरून स्वतःचा संसार उभा करतील आणि आपण त्याना मोठे केल्याचा विसर पडू देणार नाहीत. आपल्या उतारवयात आपली काळजी घेतील, अशी भावना या  वाकप्रचारात व्यक्त होते.

अवंती : एकदम सही... मेधाकाकू. शेवटी माझ्या वयोगटाचा विचार पहिल्यांदाच झालाय आज. मस्त. मस्तच...!!

मेधाकाकू : इतकी खुश झाल्येस पोरी तर पुढेही ऐक. याच वयोगटातील दिव्यांग मुलांचा संदर्भ सुद्धा तत्कालीन समाजाने घेतला आहे. जशी तरणी-हुशार मुले समाजात होती तशीच दिव्यांग मुले सुद्धा जन्माला येत होतीच. मात्र यांची एक कमतरता, निसर्ग दुसरे इंद्रिय तीक्ष्ण करून भरून काढत असतो. या वाकप्रचारात याचाच परीचय होतो.

 

 

बहिरे ऐके तेरे आणि अचरट मागे सांबारे 

‘तेरे’ म्हणजे रानात उगवणारी भाजी करण्याच्या अळूचे तृण किंवा त्याला फुटलेली पाने. ‘सांबारे’ किंवा ‘सांभारे’ म्हणजे भाजीत घालण्यासाठी बनवलेली अशा अळूच्या पानांची मुटकुळी किंवा गांठी. ज्यांना बहिरे असे संबोधन वापरले जाते अशी कर्णबधीर म्हणजे श्रुतीमंद मुले, अशा मुलांची निरीक्षणशक्ती फार उत्तम असते. उद्या स्वयंपाकाला काय काय बनवायचे आहे अशी चर्चा घरात होत असतांना, अशाच एका श्रुतीमंद मुलाला रानात उगवलेली अळूची पाने म्हणजे तेरे ऐकू येतात म्हणजेच पटकन आठवतात. त्याकाळात अन्य दिव्यांग मुलांना अचरट असे संबोधले गेले. अशाच दुसऱ्या दिव्यांग  मुलाला पटकन साम्बाऱ्याची म्हणजे अळूच्या मुटकुळ्यांची आठवण होते. शतकांपूर्वीच्या समाजातही अशा दिव्यांग मुलांच्या निरीक्षणशक्तीची दाखल घेतली जात होती.

अवंती : मेधाकाकू... आज मला त्या पूर्वजांचे कौतुक करायचे आहे. त्यांच्या सूक्ष्म निरीक्षणशक्तीसाठी. बहुधा. समाजात प्रचलित कुठलाही अनुभव त्यांच्या निरीक्षणातून सुटलेला नाही, असे निश्चित जाणवते...!! 

 

- अरुण फडके