पनवेल उपजिल्हा रुग्णालयाचे जानेवारी 2018 मध्ये होणार लोकार्पण
 महा त भा  15-Sep-2017


आ. प्रशांत ठाकूर यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा


पनवेल : पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालय जानेवारी २०१८ मध्ये सुरू करण्याचे आश्‍वासन राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री विजय देशमुख यांनी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर यांना मुंबईत बुधवारी झालेल्या बैठकीत दिले.

आता रुग्णालयाचे काम सुरू असून रुग्णांच्या सेवेसाठी पनवेल उप जिल्हा रुग्णालय लवकरच सुरू करण्यासंदर्भात आ. ठाकूर यांचा सातत्याने शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. या रुग्णालयाची सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करून रुग्णालयाचे लोकार्पण करावे, अशी पुनर्मागणी आ. ठाकूर यांनी या बैठकीत केली. या बैठकीस आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पनवेलचा वेगाने विकास होत आहे. तसेच नागरी वस्त्या वाढल्यामुळे लोकसंख्याही सतत वाढत आहे. शहरात बरीच खासगी रुग्णालये उपलब्ध आहेत, परंतु सर्वसामान्य जनतेस बर्‍याच वेळेस ही रुग्णालये आर्थिकदृष्ट्या परवडत नाही व त्यामुळे त्यांना दूरवरच्या शासकीय रुग्णालयांमध्ये जावे लागते. सदरची अडचण लक्षात घेऊन स्थानिक जनतेस लवकरात लवकर शासकीय वैद्यकीय सेवा व सुविधा मिळाव्यात या हेतूने पनवेल येथे अद्यरावत सोई सुविधा असलेले शासकीय ग्रामीण रुग्णालय लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्यक असल्याचेही आ. प्रशांत ठाकूर यांनी या बैठकीत निदर्शनास आणून दिले. यावेळी विजय देशमुख यांनी जानेवारीमध्ये रुग्णालय सुरू करण्याचे आश्‍वासन देत येत्या 15 दिवसांत या रुग्णालयातील पदनिर्मिती करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.


पनवेल शहराचा झपाट्याने होत असलेला विकास, वाढती लोकसंख्या तसेच शहराच्या चहूबाजूंनी द्रुतगती मार्ग, राज्य मार्ग, महामार्ग अशी मोठ्या प्रमाणातील रहदारी आणि औद्योगिकरण या कारणांमुळे तालुक्यातील वाढते अपघात लक्षात घेता 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाऐवजी पनवेलमध्ये 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय व ट्रॉमा केअर युनिट व्हावे, यासाठी आ. प्रशांत ठाकूर यांनी शासनाकडे आग्रही मागणी केली व त्यासाठी सतत पाठपुरावा केला होता. याची दखल घेऊन शासनाने पनवेल येथे 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून 100 खाटांचे सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय तसेच 20 खाटांचे ट्रॉमा केअर युनिट स्थापन करण्याचा निर्णय घेतला.