राहुल गांधींवर बरसले ऋषी कपूर 
 महा त भा  13-Sep-2017नवी दिल्ली :  घराणेशाही हा शब्द आपल्यासाठी काही नवीन नाही, त्यातून अभिनेत्री कंगना रणावत हिच्या वक्तव्याने तर या शब्दाला एक नवीनच ओळख मिळाली आहे. गेली अनेक महीने यावर चर्चा सुरु आहे. घराणेशाही सगळीकडेच सुरु असल्याचा सूर उमटला आहे. नुकतेच कांग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेरिका येथे केलेल्या भाषणात सिनेसृष्टीतील घराणेशाहीचाही उल्लेख करण्यात आला आहे. त्यावरून दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांनी राहुल गांधींना खडे बोल सुनावले आहेत.
ते म्हणाले की, " भारतीय सिनेसृष्टीच्या १०६ वर्षांच्या इतिहासात कपूर घराण्याचे योगदान ९० वर्षाचे आहे. त्यातून प्रत्येक व्यक्तीची निवड ही त्याच्या कामावरुन करण्यात आली आहे, नावावरुन नाही. देवदयेने आमच्या घराण्याच्या पुरुषांमधील ४ पिढ्या पृथ्वीराज कपूर, राज कपूर, रणधीर कपूर आणि रणबीर कपूर या सिनेसृष्टीत सक्रीय कार्य करत आहेत, शिवाय करीना आणि करिश्मा आहेतच. त्यामुळे उगीच बरळू नका, तुम्हाला तुमच्या कतृत्वावर लोकांचे प्रेम आणि आदर मिळवता येईल, गुंडागर्दी आणि बळजबरीने नाही." असे म्हणत ऋषी कपूर यांनी राहुल गांधीवर टीकास्त्र सोडले आहे. 

अमेरिकेतील बर्कले येथील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामध्ये विद्यार्थ्यांशी बोलताना राहुल गांधी यांनी ‘’देशातील अनेक पक्षांमध्ये हा प्रॉब्लेम आहे..अखिलेश यादव ( मुलायम सिंग यांचा मुलगा ) ,स्टालिन ( एम. के. करुणानिधी यांचा मुलगा )...इतकेच नाही तर अभिषेक बच्चनदेखील हा वारसा चालवतो. त्यामुळे मला फक्त जबाबदार ठरवू नका, कारण भारत असा चालतो. अगदी अंबानी यांचा व्यवसायदेखील असाच चालतो. हे भारतात घडते,’’ असे वक्तव्य केले होते, त्यावरुन सिनेसृष्टीवरुन त्याच्यावर टीका करण्यात येत आहे. 

राहुल गांधींच्या अमेरिकेतल्या भाषणावर एकूणच भारतात सगळीकडून टीका करण्यात येत आहे. काल केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी देखील "राहुल गांधीनी देशविरोधात परदेशात बोलून भारतीय राजकारणाच्या परंपरेचा भंग केला" असे विधान केले होते.