कोठारी येथील ३१८.९५ लाखांची पाणी पुरवठा योजना कार्यान्‍वीत
 महा त भा  13-Sep-2017

 

चंद्रपूर: राज्‍याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सततचे प्रयत्‍न, विधानसभेत विविध संसदीय आयुधांच्‍या माध्‍यमातुन केलेला पाठपुरावा यातुन खनिज विकास निधी अंतर्गत मंजूर बल्‍लारपूर तालुक्‍यातील कोठारी येथील ३१८.९५ लाख रुपये किंमतीची पाणी पुरवठा योजना कोठारी वासियांच्‍या सेवेत रूजु होत प्रत्‍यक्ष कार्यान्‍वीत झाली आहे.

 

सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिनांक २०  जुलै २०१२ रोजी खनिज विकास निधी (निर्मीती व उपयोजन) या अशासकीय विधेयकावरील चर्चेदरम्‍यान चंद्रपूर जिल्‍हयातील ऊर्जानगर, कोठारी आणि घुग्‍गुस येथील पाणी पुरवठा योजनांच्‍या प्रस्‍तावाला खनिज विकास निधीच्‍या माध्‍यमातुन मंजूरी देण्‍याची मागणी रेटुन धरली होती. शासनातर्फे विशेष बाब म्‍हणून या पाणी पुरवठा योजनांना मान्‍यता देण्‍यात येईल,  असे स्‍पष्‍ट आश्‍वासन तत्‍कालीन खनिकर्म विकास राज्‍यमंत्र्यांनी दिले होते. या आश्‍वासन पुर्तीसाठी सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्‍या पाठपुराव्‍याच्‍या फलस्‍वरूप शासनाने विशेष बाब या सदराखाली या तीन योजनांच्‍या प्रस्‍तावांना उद्योग, ऊर्जा व कामगार विभागातर्फे दिनांक २५ मार्च २०१३ च्‍या शासन निर्णयान्‍वये प्रशासकीय मान्‍यता दिली.

 

बल्‍लारपूर तालुक्‍यातील कोठारी या गावात खनिज विकास निधीच्‍या माध्‍यमातुन पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्णत्‍वास आले असुन ही योजना जनतेच्‍या सेवेत रूजु झाली आहे. कोठारी नजिकच्‍या काटवली गावाजवळ वर्धा नदीवर या पाणी पुरवठा योजनेचा उदभव असुन इनटेक वेल, कनेक्‍टींग मेन, जॅकवेल, पोहोच पुल, अशुध्‍द पाणी पंपींग मशीनरी, अशुध्‍य पाण्‍याची उर्ध्‍वनलिका, जलशुध्‍दीकरण केंद्र, शुध्‍द पाण्‍याची पंपींग मशीनरी, शुध्‍द पाणी उर्ध्‍वनलिका, पाण्याची उंच टाकी, वितरण व्‍यवस्‍था आदी कामांचा या पाणी पुरवठा योजनेत प्रामुख्‍याने समावेश आहे. कोठारी शहराची वाढती लोकसंख्‍या लक्षात घेता शहरात भिषण पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत होता. या पाणी टंचाईच्‍या समस्‍येवर प्रभावी उपाययोजना करण्‍यासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्‍या भगीरथ प्रयत्‍नातुन अखेर कोठारी येथील पाणी पुरवठा योजना जनतेच्‍या सेवेत रूजु झाली असुन कोठारी वासियांमध्‍ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.