रायन इंटरनॅशनल स्कूल हत्या प्रकरण : शाळेच्या व्यवस्थापकाला अटक
 महा त भा  13-Sep-2017गुरूग्राम : हरियाणामधील गुरूग्राम येथील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालेल्या ७ वर्षी बालकाच्या हत्या प्रकरणी शाळेचे व्यवस्थापक फ्रान्सिस थॉमस यांना आज अटक करण्यात आली आहे. हत्या झालेल्या मुलाचे पोस्ट मार्टम रिपोर्ट देखील आले असून हे प्रकरण सोहना न्यायालयातून दुसरीकडे ट्रान्स्फर करण्याची मागणी केली आहे. 


दरम्यान आज सकाळीच प्रद्युम्न ठाकुर याचा पोस्ट मार्टम रिपोर्ट आला आहे. यामध्ये मुलाची हत्याही ही चाकूने गळा चिरून करण्यात आली असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. तसेच बालकावर कसल्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार करण्यात आलेला नाही, असे देखील डॉक्टरांनी रिपोर्टमध्ये स्पष्ट केले आहे. त्यामुळे या घटनेला एक वेगळेच वळण प्राप्त झाले आहे. दरम्यान शाळा व्यवस्थापकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे. 


रायन शाळेत गेल्या काही दिवसांपूर्वी प्रद्युम्न ठाकुर या ७ वर्षीय विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली होती. या बालकावर लैंगिक अत्याचार करण्याचा देखील प्रयत्न करण्यात आल्याचे बोलले जात होते. त्यामुळे संपूर्ण देशभरातून या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला जात होता. या प्रकरणी शाळेच्या बस चालकाला देखील अटक करण्यात आली होती.