संत रामपाल यांच्या अनुयायांनी दिले जाहीर ज्ञानचर्चेचे आव्हान
 महा त भा  13-Sep-2017पुणे :  अखाडा परिषदेने १४ साधु संतांना भोंदू जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर संत रामपाल यांच्या अनुयायांनी अखाडा परिषदेला शास्त्रानुसार आध्यात्मिक ज्ञानचर्चा करण्याचे आव्हान केले आहे. तसेच अखाडा परिषदेला संतांना भोंदू ठरविण्याचा कुठलाही कायदेशीर अधिकार नाही. भारतीय लोकशाही धर्मनिरपेक्ष आहे. आपल्या देशात केवळ न्यायालयालाच असे निर्णय घेण्याचा अधिकार आहे, असे देखील अनुयायांतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. आज पुण्यात घेण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत अनुयायांनी आपले म्हणणे स्पष्ट केले.

अखाडा परिषदेच्या तत्वज्ञानी लोकांनी संत रामपालजी यांच्यासोबत जाहीर ज्ञानचर्चा करावी तसेच रामपालजी यांची बरोबरी करावी असे आव्हान संत रामपाल यांच्या अनुयायांनी केले आहे. २००९-२०१० मध्ये देखील संतरामपाल यांनी जाहीर ज्ञानचर्चेचे आव्हान केले होते, झी जागरण या वाहिनीवर ही जाहीर चर्चा करणार असल्याचे ठरले होते मात्र त्यावेळी ज्या लोकांना ज्ञान नसल्याने या चर्चेत सहभागी होता आले नाही, त्यांनी आपले अज्ञान लपविण्यासाठी या भोंदू बाबांच्या यादीत संत रामपाल यांचे नाव समाविष्ट केले आहे, असा आरोप या अनुयायांनी आज पत्रकार परिषदेत केला.

जे जे या आध्यात्मिक चर्चेत सहभागी होणार नाहीत, त्यांनी हात स्वीकारली आहे असे जाहीर गृहीत धरण्यात येईल, तसेच लवकरात लवकर भोंदू बाबांच्या यादीतून संत रामपाल यांचे नाव काढले नाही, तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे देखील या अनुयायांनी आज जाहीर केले. ही ज्ञानचर्चा यूट्यूबच्या माध्यमातून सर्व समाजांनी बघावी असे आवाहनही संत रामपाल यांच्या अनुयायांतर्फे करण्यात आले.

नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या भोंदू बाबांच्या यादीत १४ पैकी एक नाव संत रामपाल यांचे देखील होते, त्यामुळे त्यांच्या अनुयायांनी आपला रोष व्यक्त करत या घटनेचा विरोध केला, आणि त्या यादीतून रामपाल यांचे नाव काढण्यात यावे असे आवाहन केले.