१० लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी फुटबॉल खेळणार - विनोद तावडे
 महा त भा  13-Sep-2017


 

भारतात पुढील महिन्यात होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्रात येत्या शुक्रवारी (१५ सप्टेंबर) १० लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी फुटबॉल खेळणार आहेत. राज्यातील सर्व शाळांमध्ये या दिवशी फुटबॉल खेळून संपूर्ण महाराष्ट्र फुटबॉलमय होणार आहे, असे राज्याचे क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी आज सांगितले. १५ सप्टेंबरला राज्यभर होणाऱ्या या कार्यक्रमाविषयी माहिती देण्यासाठी मुंबई येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषद ते बोलत होते.

 

तावडे यावेळी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेप्रमाणे फिफा अंडर १७ विश्वचषक स्पर्धेनिमित्ताने  देशभरातल्या १ कोटी १० लाख लोकांनी फुटबॉल खेळावे अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यावरून महाराष्ट्रात "महाराष्ट्र मिशन १-मिलियन" ची घोषणा केली. यानुसार येत्या १५ तारखेला राज्यभर १० लाखापेक्षा अधिक विद्यार्थी, युवक फुटबॉल खेळणार आहेत. अशा प्रकारचा अभिनव कार्यक्रम करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार आहे.

 Embeded Object

मुलांनी ई-गॅझेटपासून दूर राहावे हाच उद्देश

इ-गॅझेटकडे शालेय विद्यार्थ्यांचा ओढा वाढत चालला असून मुलांचे मैदानावर खेळण्याचे प्रमाण कमी होत आहे. आजची मुले विविध खेळांचे सामने मैदानावर कमी तर मोबाईल किंवा संगणकावर अधिक प्रमाणात खेळताना दिसतात. त्यामुळे मुलांनी इ-गॅझेट पासून दूर राहावे आणि मैदानावर येऊन फुटबॉलचा आनंद लुटावा हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. मुलांनी अधिक वेळ मैदानावर द्यावा यासाठीच फुटबॉल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे क्रीडामंत्र्यानी यावेळी सांगितले.

 

Embeded Object

 

राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन

शुक्रवारी, १५ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता मुंबई जिमखाना, फोर्ट येथे राज्यपाल चे. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते "महाराष्ट्र मिशन १-मिलियन" या फुटबॉल खेळाच्या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. या दिवशी बॉम्बे जिमखाना येथे आठ वेगवेगळे सामने होणार आहेत. मुंबई जिमखाना येथे मुलींचा संघ, मुलांचा संघ, मुंबईचे डबेवाले, क्रीडा पत्रकार विरुध्द राजकीय पत्रकार, अंध विद्यार्थी, आदिवासी संघ असे फुटबॉलचे सामने खेळले जाणार आहेत.

 

 Embeded Object