चंद्रपूरमध्ये साकारणार वन वृक्ष प्रजातींची ''जीन बँक''
 महा त भा  13-Sep-2017

 

बॉटनिकल गार्डनमध्ये नावीन्यपूर्ण संकल्पना राबविण्याच्या वनमंत्र्यांच्या सूचना

चंद्रपूर: चंद्रपूर येथील बॉटनिकल उद्यानामध्ये विदर्भातील वन वृक्ष प्रजातीची जनुक संवर्धन अर्थांत ''जीन बँक'' निर्माण केली जाणार असून या संकल्पनेप्रमाणेच उद्यानाची उभारणी करतांना अत्यंत नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले जावेत, अशा सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. सह्याद्री अतिथीगृहात यासंबंधी झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

  

वन वृक्ष प्रजातीच्या या ''जीन बँके''चा उपयोग विद्यार्थी आणि संशोधकांना होणार असून त्यांना संशोधनासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा तिथे उपलब्ध करून देण्यात याव्यात असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.  लखनऊ येथील 'नॅशनल बॉटनिकल रिसर्च लॅब्रोटरी' ही देशातील बॉटनी या विषयात काम करणारी प्रमुख संशोधन संस्था असून ती या 'जीन बँके'बरोबर चंद्रपूर बॉटनिकल उद्यानामध्ये 'कॅकटस गार्डन', 'बोनसाय गार्डन', 'डिहायड्रेटेड फ्लॉवर्स गार्डन' या उपक्रमावर काम करत आहे.

 

चंद्रपूर बॉटनिकल उद्यानाचे काम करतांना इतर उपक्रम ही अतिशय नावीन्यपूर्ण पद्धतीने निवडून उद्यानाचे काम वेगाने पुढे न्यावे. या बॉटनिकल उद्यानामध्ये वन विभागाने औषधी वनस्पतींचे स्वतंत्र दालन निर्माण करावे तसेच या उद्यानाचे काम करतांना देशातील इतर बॉटनिकल उद्यान पहाव्यात, तिथल्या चांगल्या कल्पना येथे राबवाव्यात. केंद्र शासनाने  अशी काही उद्याने देशात निर्माण केली आहेत काय याचा अभ्यास करावा, केल्या असल्यास यासाठी केंद्र शासनाकडून काही निधी मिळतो का याचाही शोध घ्यावा. निधी मिळत असल्यास त्यासंबंधीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवावा असेही ते म्हणाले.