पालकमंत्र्यांनी केली पिक कर्जमाफी अर्जांची पाहणी
 महा त भा  13-Sep-2017


अमरावती : शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पिक कर्जमाफी योजनेच्या कर्जमाफी अर्जांची नोंदणी तातडीने पूर्ण करावी, असे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील अर्ज नोंदणीची पाहणी करण्यासाठी पोटे यांनी काल जिल्ह्यातील ३७ सेतू केंद्रांना भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला तसेच कर्जमाफी अर्ज लवकरात लवकर भरून घेण्यासंबंधी संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना देखिल दिल्या आहेत.


राज्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी राज्य सरकारने देशातील सर्वात मोठी कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील एक शेतकरी या योजनेतून सुटता कामा नये, असे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या देशाचे काटेकोरपणे पालन करत, जिल्ह्यातील सर्व सामान्य शेतकऱ्यांपर्यंत या योजनेचा लाभ पोहचवण्यासाठी प्रयत्न करा, असे आदेश पोटे यांनी यावेळी दिले.


अर्ज भरण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांची देखील पोटे यांनी भेट घेतली व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. अर्ज भरण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना कसल्याही प्रकारची अडचण होणार नाही, यासाठी देखील काळजी घेण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच अर्ज भरण्यासाठी आलेल्या कोणत्याही शेतकऱ्याची आर्थिक पिळवणूक करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये, अन्यथा त्याच्या कठोर कारवाई करण्यात येईल, असे देखील पोटे यांनी बजावले आहे.