डॉ . मोरे हत्या तपास प्रकरणी पथके रवाना
 महा त भा  13-Sep-2017

 

जळगाव: जिल्हा शासकीय रूग्णालयातील कुष्ठरोग विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. अरविंद मोरे  यांच्या हत्येप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक रवाना झाले असून धुळे तसेच नंदुरबार येथेही पोलीस पथकांचा सर्व पातळीवरून तपास सुरू आहे. डॉ. मोरे यांचा खून करण्यात आला, ही शक्यता तपासातून समोर येत आहे.

 

परंतु, अजून त्याबाबत स्पष्टपणे सांगण्यात आलेले नाही. डॉ. अरविंद मोरे यांची हत्या झाल्याचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला तेव्हा पासूनच पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. नाशिक येथे गेलेल्या स्थानिक गुन्ह्याच्या पथकाने डॉक्टर मोरे यांच्याशी संबंधीत एकाची भेट घेऊन त्यांचे जाबजबाब नोंदवून घेतले. धुळे येथे गेलेल्या पथकाने ते वास्तव्यास होते त्या परिसरात जाऊन माहिती जाणून घेतली.

 

नंदुरबार येथे ही पोलिसांनी शोध मोहीम राबविली. सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी यासदर्भात माध्यमांशी बोलताना सांगितले की, पोलीस पथक धुळे, नाशिक येथे रवाना झाले असून तपास सुरू आहे. नातेवाईकांच्या माहितीनुसार डॉ. अरविंद मोरे यांचे सर्कल लिमिटेड होते. खून झाला त्या घटनास्थळी न्याय वैद्यक प्रयोग शाळेच्या अभ्यासकांनी रक्ताचे नमुने घेतले आहेत. या गुन्ह्यात किती लोकांचा सहभाग होता किंवा कसे? हे जाणून घेण्याच्या अनुषंगाने हे नमुने फॉरेन्सिक लॅबकडे अभ्यासनासाठी पाठविले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.