वीरपत्नीच्या कर्तृत्वाला सलाम!
 महा त भा  13-Sep-2017

 

 

आयुष्याच्या एका टप्प्यावर अशी एक घटना घडून जाते ज्यातून आपली सर्व समीकरणे बिघडतात. आता सगळे काही संपले, जगण्याच्या सर्व आशाआकांक्षा मावळल्या, असे विचार मनात येऊ लागतात पण अशा कठीण परिस्थितीमध्ये न डगमगता, दुःखाला कवटाळून बसण्यापेक्षा त्यावर पाय रोवून ठामपणे उभे राहण्याची किमया काही रणरागिणी करून दाखवतात. अर्थात हे प्रत्येकालाच जमते असे नाही. परंतु, जो कोणी हे करून दाखवतो त्याची इच्छाशक्ती दांडगी असते. आयुष्यात अशा काही गोष्टी घडून जातात ज्यातून भावनांना महत्त्व द्यायचे की कर्तव्याला, असा एक पर्याय निवडावा लागतो. परंतु, अवघड वळणावर भावना बाजूला ठेवून काहीजण कर्तव्याची निवड करतात. असाच काहीसा अनुभव स्वाती महाडिक यांनी केलेल्या कर्तृत्वाकडे बघून येतो. जम्मू-काश्मीरमधल्या कुपवाडाच्या जंगलात देशाच्या सीमेचे रक्षण करताना वीरपुत्र संतोष महाडिक यांना १७ नोव्हेंबर २०१५ रोजी वीरमरण आले. त्यानंतर स्वाती महाडिक यांनी सैन्यदलामध्ये जाण्याचा अतिशय धाडसी निर्णय घेतला आणि त्यानंतर त्यांनी जवळपास दीड वर्ष प्रशिक्षण घेऊन भारतीय लष्करात लेफ्टनंट पदावर त्या रुजू झाल्या. दुःखाशी दोन हात करून त्याला ठामपणे सामोरे जाण्याचा मार्ग त्यांनी स्वीकारला आणि कष्टाच्या मार्गातून त्याची स्वप्नपूर्ती झाली. सातारा तालुक्यातील पोगरवाडी या छोट्या गावातील संतोष यांच्या हौतात्म्याने अवघा महाराष्ट्र हळहळला होता. सातारा जिल्ह्यात शोकाकुल वातावरणातही संतोष यांच्या पराक्रमाला सलाम करून त्यांना अखेरचा निरोप दिला. एकीकडे पती गमावल्याचे दुःख, पदरात असलेली दोन लहान मुले, सासू-सासर्‍यांची जबाबदारी तर दुसरीकडे स्वाती यांना त्यांच्या मनातील जिद्द अस्वस्थ करीत होती. मनात दुःखाचा डोंगर असतानाही दुसर्‍या बाजूला आपल्या शहीद झालेल्या पतीचे देशप्रेमाविषयी असलेले विचार त्यांच्या मनामध्ये येत होते. त्याचवेळी त्यांनी आपणही सैन्यात अधिकारी होऊन देशाच्या सेवेसाठी योगदान देणार, असे जाहीर केले. पती हुतात्मा झाल्यानंतर अशा प्रकारचे धैर्य दाखविण्याची बाब वाटते तितकी सोपी निश्‍चित नव्हती. संतोष महाडिक यांनी स्वतःला देशसेवेला वाहून घेतले होते. देशसेवा हे आपले पहिले प्रेम आहे, असे ते नेहमीच म्हणत असतो. स्वाती महाडिक यांनी आपल्या शहीद पतीचे हे प्रेम टिकून राहण्यासाठी स्वतः सैन्यदलामध्ये रुजू होण्याचा निर्णय घेतला आणि त्यातून त्यांचा संघर्षाचा प्रवास सुरू झाला. पुणे विद्यापीठाच्या पदवीधर असलेल्या स्वाती वयाच्या पस्तिशीत स्टाफ सिलेक्शनची परीक्षा उत्तीर्ण झाल्या होत्या. या परीक्षेसाठी स्वाती यांचे वय अधिक असले, तरी लष्कर व संरक्षणमंत्र्यांनी फक्त वयाच्या अटीत सूट दिली होती. त्यानंतर मुलांना शिक्षणासाठी बोर्डिंगमध्ये ठेवून स्वाती यांनी या परीक्षेसाठी कसून तयारी केली होती. अखेर पहिल्याच प्रयत्नात त्या ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर बंगळुरू येथे त्यांनी वैद्यकीय आणि शारीरिक चाचणीही यशस्वीपणे पार पाडल्याने स्वाती यांची चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग ऍकॅडमीसाठी (ओटीए) निवड झाली होती. ११ महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी त्यांची पहिली पोस्टिंग पुण्यातील देहू रोड येथे होणार आहे.

 

हुतात्मा पतीचे अपूर्ण कार्य पूर्ण करण्यासाठी, दहशतवादाशी झुंज देण्यासाठी त्या सज्ज झाल्या आहेत. त्यांच्या सासूने तर चक्क माझी सून विधवा नाही तर माझ्या मुलाला अमर करणारी म्हणून ती आजही सौभाग्यवतीच आहे, असे अभिमानाने सांगितले. पदवीधर झाल्यानंतर शिक्षिका म्हणून विद्यार्थी घडविणारे स्वाती यांचे हात आता दहशतवाद्यांशी लढण्यासाठी प्रशिक्षित झाले आहेत. या वीरपत्नीचे हे धाडस केवळ महिलाच नव्हे तर पुरुषांसह सार्‍या समाजासमोरच एक आदर्श निर्माण करणारे आहे.  

 

- सोनाली रासकर