माऊली तू कुठेशी गेली??
 महा त भा  12-Sep-2017


’’माऊली कुठेशी गेली? परवाच तं भेटली व्हती. बोलत व्हती. मावशी, आता पुरगा कामाला लागला. निवांत घरी राहा, आता आरामकरा अन् अपुडेट साडी घाला. मी घेऊन देऊ का? अन् आज हे असं झालं.’’ काष्टी पातळ नेसलेली ती वयोवृद्ध स्त्री धाय मोकलून रडत रडत म्हणत होती. आपली आई गेली, आपली माऊली गेली, आपली पोटची पोर गेली म्हणत वेगवेगळ्या स्तरातले हजारो लोक भर उन्हात रडत होते. तिच्या आठवणी काढत स्फुंदत होते. वातावरणही कुंद झाले होते, शब्दातीत शोक वातावरणात पसरला होता. ती होतीच तशी सगळ्यांना मायेच्या पंखाखाली घेणारी... शैलजा विजय गिरकर.

पाच वेळा नगरसेविक, एकदा उपमहापौर आणि आता भारतीय जनता पक्षाने महानगरपालिकेत महापौर ठरवला असता, तर कदाचित शैलजाताई महापौरही होऊ शकल्या असत्या... प्रगतिपथावर असणार्‍या त्यांच्या राजकीय कारकिर्दीचे यश हे त्यांच्या ’साधं जीवन उच्च विचार’ यामुळेच असेल हे निःसंशय. राजकीय गुर्मीचा आणि सत्तेचा पारा शैलजाताईंच्या डोक्यात कधी गेलाच नाही. साधी साडी, साधी केशभूषा, कपाळाला गोल टिकली आणि तोंडभरून निर्व्याज हसू, हीच शैलजाताईंची प्रतिमा. या प्रतिमेमध्ये सर्जनशील प्रतिभेचा अलौकिक आविष्कारही होता. झाल्या निवडणुका, जिंकलो आपण, आता पब्लिकला भेटू पुढच्या निवडणुकीला, अशा टिपीकल राजकीय बाण्याला शैलजाताईंचा विरोध होता. त्यामुळे निवडणुका झाल्या की जिंकण्या- हरण्याची वाटही न बघता शैलजाताई तात्काळ लोकांमध्ये जाऊन लोकांची कामं करायला लागत. एकदा त्यांना विचारले, ’’तुमच्या सातत्याच्या विजयाचे कारण काय आहे?’’ यावर शैलजाताई म्हणाल्या,’’याचे कारण आहे परिसरातले सगळ्याच लोकांशी घरच्यांसारखे असलेले संबंध.’’ त्यांचे म्हणणेही खरेच होते, कारण शैलजाताईंशी एकदा संपर्क झाल्यावर कुणाही त्रयस्ताला वाटेच की, शैलजाताई आपल्या कुटुंबातल्याच एक आहेत. याचे कारण काय असावे? याचे कारण होते, त्यांचा मृदू स्वभाव आणि कधीही उंच न होणारा आवाज. परिस्थिती कोणतीही असू दे, शैलजाताईंनी ती शांतपणे हाताळली.

गेली दोन दशके राजकारणात कधीही मागे न वळून पाहणार्‍या शैलजाताई या अजातशत्रूच होत्या. तसे पाहायला गेले तर राजकारण असे क्षेत्र आहे की, कुणालाही त्याच्या कर्तृत्वापासून, यशापासून दूर खेचायचे तर त्या व्यक्तीची बदनामी करा, हे सूत्र. पण शैलजाताईंच्या राजकीय आणि वैयक्तिक आयुष्यातही कधीही काहीही वादग्रस्त विधान कुणीही करू शकले नाही. कारण, शैलजाताई यांनी कधीही कुणाचे वाईट होईल किंवा कुणाला वाईट वाटेल असे कृत्यच काय, शब्दही उच्चारले नाहीत. तसेच त्यांना भेटण्यासाठी किंवा त्यांच्याशी बोलण्यासाठी मध्यस्थाची गरज नसे. अर्थात एक गृहिणी, एक तत्पर नगरसेविका, एक धडाडीची समाजसेविका म्हणून प्रत्येकाचे फोन स्वीकारणे, संवाद करणे हे शैलजाताईंसाठी मोठे जिकीरीचे कामहोते. पण, शैलजाताई कितीही गर्दीत, कामात असल्या तर आलेला फोन घ्यायच्या, कामघेऊन आलेल्या प्रत्येकाला भेटायच्या. त्यांच्याकडे कुणी कामघेऊन गेले आणि त्या माणसाचे कामझाले नाही, असे कधी झाले नाही. प्रत्येक बाबतीत शैलजाताईंचा वॉर्ड आघाडीच्या प्रगतिपथावर असे. एका गृहिणीने कसे असावे तर शैलजाताईंसारखे... एका आईने, एका सासूने, एका मैत्रिणीने आणि नगरसेविकेने कसे असावे, तर शैलजाताईंसारखेच... राजकारणात स्वत्व निर्माण करू इच्छिणार्‍या अनेक राजकीय कार्यकर्तींच्या शैलजाताई या आदर्श होत्या. त्यांचे पती भाई गिरकर म्हणजे राजकारण आणि समाजकारणातले मान्यवर नाव. पण ‘पती सत्ताधारी म्हणून मलाही मान द्या,’ असा पोकळ धाक शैलजाताईंनी कधी दाखवला नाही. पतीच्या कार्याशी समन्वय साधत त्यांनी स्वतःचे राजकीय आणि सामाजिक वर्तुळ निर्माण केले. ६ डिसेंबरला चैत्यभूमीवरचा समता परिषदेचा स्टॉल असू दे, की महा कोकण महोत्सव असू दे की, समता परिषद किंवा मुंबई भाजपचा कोणताही मोठा कार्यक्रमअसू दे, सर्वच कार्यक्रमांमध्ये शैलजाताई ठामपणे कार्यरत. पण असे असूनही ‘मी हे केले, मी ते केले,’ असा बडेजाव ना त्यांच्या शब्दात असे ना चेहर्‍यावर. देवघरातल्या शांत निरंजनासारखे त्यांचे पवित्र व्यक्तिमत्त्व. १० सप्टेंबर रोजी त्यांचा अकस्मात मृत्यू झाला. काळजाला चटका बसला आहे. माऊली तू कुठेशी गेली??

-योगिता साळवी