इर्मा वादळाने घेतला विश्राम
 महा त भा  12-Sep-2017


फ्लोरिडा : गेल्या आठवड्याभरापासून कॅरेबियन सागरात धुमाकूळ घालत असलेल्या इर्मा वादळाने आता विश्राम घेतला आहे. अमेरिकेच्या दक्षिण किनारपट्टीवरील फ्लोरिडा सलग दोन दिवस झोडपल्यानंतर हे वादळ आता शांत झाले आहे. मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे फ्लोरिडाचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळामुळे अनेक ठिकाणी पायाभूत सुविधा कोलमडून पडल्याच्या असून त्यांच्या दुरुस्तीसाठी आठवडाभराचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


कॅरेबियन सागरात निर्माण झालेले हे वादळ रविवारी पहाटे फ्लोरिडाच्या किनारपट्टीवर येऊन आदळले. तशी १३० किमी वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांनी फ्लोरिडामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता. अनेक ठिकाणी झाडे आणि विजेचे खांब उमळून पडल्यामुळे फ्लोरिडातील वाहतूक आणि विजपुरवठा पूर्णपणे खंडित झालेला आहे. अनेक ठिकाणी भूस्खलन झाले असल्यामुळे जवळजवळ १० हजार नागरिकांवर वादळामुळे विस्थापित होण्याची वेळ आली आहे. तर ४ लाख घरांचा विजपुरवठा खंडित झाल्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांना अंधारातच राहावे लागत आहे.

Embeded Object


वादळामुळे अजून तरी कसल्याही प्रकारची जीवित्तहानी झाल्याची घटना पुढे आलेली नाही. परंतु काही नागरिक वादळामुळे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहित अमेरिकेतील स्थानिक वृत्तपत्रांनी दिली आहे.दरम्यान जखमी नागरिकांचा देखील आकडा अद्याप समोर आलेला नाही.


वादळाने विश्रांती घेतल्यानंतर फ्लोरिडा, मायामी येथे पुन्हा एकदा पायाभूत सुविधा उभारण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांवर अजूनही पाणी साठलेले असल्यामुळे वाहतूकीला थोड्याफार प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. परंतु आठवड्या भराच्या कालावधीत सर्व व्यवस्था पूर्ववत होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.