गौरी लंकेश यांचे मारेकरी कधी पकडले जातील ?
 महा त भा  12-Sep-2017


 

मागच्या आठवड्यात पाच सप्टेंबरला कर्नाटक राज्यातील धडाडीच्या महिला पत्रकार, संपादक व कार्यकर्त्या गौरी लंकेश (जन्म १९६२) यांचा त्यांच्या राहत्या घरी अज्ञात मारेकऱ्यांनी खून केला. त्यानंतर प्रसारमाध्यमे व समाजमाध्यमांवर उलटसुलट प्रतिक्रियांचा गदारोळ उठलेला आहे. आज गौरी यांचा खून होऊन आठवडा झालेला असून खुन्यांच्या तपासाच्या दृष्टीने काही खास प्रगती झाली आहे, असे म्हणवत नाही. हे अतिशय दुःखद आहे.

कोणाचाही खून जर झाला असेल तर त्याचा निषेध केलाच पाहिजे. सरकारने ताबडतोब गुन्हेगारांना अटक करून त्यांच्यावर खटले भरले पाहिजेत. याबद्दल कोणीही दुमत व्यक्त करणार नाही. मात्र, या झपाट्याने पुरोगामी विचारवंत व पत्रकारांनी या खुनाबद्दल उजव्या विचारसरणीतील असहिष्णुतेला दोष दिला. त्याबद्दल मात्र विचार करावा लागेल. प्रत्येक खून हा राजकीय हेतूंसाठीच केला जातो, असे समजणे चूक आहे. काही महिन्यांपूर्वी कोल्हापूर येथे घडलेली घटना आजही अनेकांच्या स्मरणात असेल. मराठीचे निवृत्त प्राध्यापक किंबहुने यांचा खून संपत्तीच्या वादातून झाला होता पण त्याअगोदरच काही पत्रकारांनी व अभ्यासकांनी दाभोळकर, पानसरे व कलबुर्गी यांच्या पंगतीला किंबहुने यांच्या खुनाला बसवले होते. तसा प्रकार गौरी लंकेश यांच्याबद्दल होऊ नये.

 

ज्या गौरी लंकेश यांच्या खुनाबद्दल आजकाल सतत प्रसारमाध्यमांतून व समाजमाध्यमांतून चर्चा सुरू आहे त्या व्यक्तीविषयी थोडक्यात व महत्त्वाची माहिती असणे गरजेचे आहे. गौरी लंकेश यांनी बरीच वर्षे इंग्रजी पत्रकारितेत काढली. त्याकाळी त्यांची ओळख म्हणजे एक ‘व्यावसायिक पत्रकार’ अशी होती. त्यांचे वडील पी. लंकेश कन्नड पत्रकारितेतील एक आदरणीय नाव. त्यांचे स्वतःच्या मालकीचे व स्वतःच्या संपादकत्वाखाली एक कन्नड भाषिक ‘लंकेश पत्रिके’ हे साप्ताहिक होते. हे साप्ताहिक त्यांनी १९८२ साली सुरू केले होते. पी. लंकेश यांच्यासाठी पत्रकारिता म्हणजे समाजप्रबोधनाचे एक साधन होते. त्यांची शैली फार भेदक व बोचरी होती. मात्र, पी. लंकेश यांची शैली ‘लेकी बोले सुने लागे’ या प्रकारात मोडणारी होती. कर्नाटकातील जवळपास सर्व पक्ष त्यांच्या लेखणीचा आदर करत व त्यांना वचकून असत. पी. लंकेश यांचे २००० साली निधन झाल्यानंतर साप्ताहिक बंद झाले असते पण त्यांची सुकन्या गौरी लंकेश यांनी साप्ताहिक चालवण्याची जबाबदारी स्वीकारली. पी. लंकेश यांना दोन मुली व एक मुलगा. कायदेशीर कारणांसाठी ‘लंकेश पत्रिके’वर त्यांचा मुलगा इंद्रजित लंकेश यांचे नांव संपादक म्हणून छापले जात असे. पी. लंकेश यांच्यानंतर इंद्रजित व गौरी लंकेश यांच्यात संपादकीय धोरणांबद्दल तात्त्विक मतभेद झाले. परिणामी गौरी यांनी स्वतःचे ‘गौरी लंकेश पत्रिके’ हे साप्ताहिक सुरू केले.

 

गौरी यांची शैली अतिशय आक्रमक होती. त्यांच्या लेखनात प्रसंगी बेधडकपणा होता व त्या सरळ आरोप करत असत. परिणामी त्यांना लवकरच भरपूर शत्रू मिळाले. त्यांनी सातत्याने भगव्या राजकारणावर व हिंदू धर्मावर प्रतिकूल लेखन केले. त्यांनी २००२ साली धार्मिक सलोखा निर्माण व्हावा यासाठी ‘फोरम फॉर कम्युनल हार्मनी’ ही संस्था स्थापन केली होती.

 

त्यांच्यावर आजपर्यंत सुमारे पाच डझन अब्रू नुकसानीचे खटले दाखल करण्यात आलेले आहेत. यातील एका खटल्यात तर त्यांना सहा महिन्यांचा तुरुंगवास व दहा हजार रुपये दंड झाला होता. या शिक्षेसाठी त्या तुरुंगात होत्या व खून झाला तेव्हा त्या जामिनावर बाहेर आलेल्या होत्या.

 

गौरी लंकेश चालवत असलेल्या साप्ताहिकात सुमारे ५० लोक नोकरी करत होते. या साप्ताहिकाला फारशा सोडा जवळपास कधीही जाहिराती मिळाल्या नव्हत्या. त्याचप्रमाणे खपाच्या उत्पन्नाची बाजूसुद्धा तशी नरम गरमच होती. अशा स्थितीत त्यांच्या साप्ताहिकाचा आर्थिक डोलारा कसा उभा होता, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 

दुसरीकडून असे दाखवता येते की, राजकीय तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात त्यांची ओळख डाव्या विचारांचे समर्थक अशी होती. त्यांना नक्षलवादी तरुणांबद्दल सहानुभूती होती. त्यांच्या प्रयत्नांनी अनेक नक्षलवादी तरुणांचे पुनर्वसन होऊ शकले.

 

मे २०१४ मध्ये भाजपचे सरकार केंद्रात सत्तारूढ झाले व त्यापाठोपाठ अनेक राज्यांत भाजपची सत्ता एक तर स्वबळावर किंवा मित्रपक्षांच्या मदतीने आली. अशा स्थितीत अनेक डाव्या पत्रकारांची चिडचिड सुरू झाली. आज तर डावे विरुद्ध उजवे अशी स्पष्ट लढाई दिसून येते. या लढाईत गौरी लंकेश ठळकपणे डाव्यांच्या बाजूने उभ्या राहिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर त्यांच्या खुनाची चर्चा झाली पाहिजे.

 

त्यांच्या खुनावरून जे किळसवाणे राजकारण खेळले जात आहे ते मात्र उबग आणणारे आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी केरळात जेव्हा आर. एस. एस. च्या स्वयंसेवकांवर जीवघेणे हल्ले होतात तेव्हा मौन बाळगतात पण जेव्हा गौरी लंकेशसारख्या डाव्या विचारांच्या पत्रकारांचा खून होतो तेव्हा मात्र त्याविरोधात रान उठवतात. यातील दुट्टपी वागणे उघड आहे. हा दुटप्पीपणा योग्य नाही. एक स्पष्ट भूमिका असायला हवी व ती म्हणजे राजकीय विचारांचा सामना वैचारिक पातळीवरच व्हावा. तेथे हिंसेला स्थान नसावे. मात्र आपल्या वैचारिक विश्वाच्या जवळ असलेल्या व्यक्तींवर जीवघेणे हल्ले झाले तर निषेध करायचा व आपल्या वैचारिक विरोधातल्या व्यक्तींचे खून होत असतील तर मूग गिळून गप्प बसायचे, यात स्वार्थी राजकारण आहे. राहुल गांधींसारख्या देशातील जुन्या पक्षाचे नेतृत्व करणार्‍या नेत्याला असे दुटप्पी वागणे शोभत नाही.

 

हे दुटप्पीपणाचे प्रकार फक्त आपल्याकडेच आहे, असे नसून युरोपातील काही देशांत हा प्रकार सर्रास होत असत. खास करून १९४५ ते १९९१ दरम्यान जेव्हा शीतयुद्ध जोरात होते तेव्हा अमेरिका समर्थक विरुद्ध रशियासमर्थक यांच्यात सतत अशा आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असत. डावे विचारवंत हिटलरसारख्या भांडवलदारांच्या बगलबच्च्याने कसे ज्यूंचे शिरकाण केले की, त्यावर उजव्या विचारसरणीचे विचारवंत स्टॅलिनने शेतकऱ्यांचे कसे मोठ्या प्रमाणात शिरकाण केले याबद्दल गळे काढत असत. रशियाने हंगेरी, तत्कालीन झेकोस्लोव्हाकिया वगैरे देशांतील लोकशाहीवादी लढे कसे चिरडले, असे आरोप समोर आले की लगेच अमेरिकेने व्हिएतनामी जनतेवर कसे अमानुष हल्ले केले वगैरे माहिती प्रकाशित होत असे. तेव्हा युरोपात व काही प्रमाणात आशियातसुद्धा भांडवलशाही विरुद्ध मार्क्सवाद अशी वैचारिक लढाई जुंपली होती. १९९१ साली सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्यावर काही काळ ही वैचारिक लढाई थांबली. आता पुन्हा त्या लढाईने उसळी मारलेली असली, तरी त्यात तेव्हाची वैचारिक धग नाही.


गौरी लंकेशच्या खुनाच्या निमित्ताने आपल्या देशातसुद्धा वेगळ्या प्रकारची वैचारिक पण तितकीच भीषण वैचारिक लढाई सुरू आहे, हे दिसून आले. प्रथमदर्शनी तरी गौरी लंकेशचा खून राजकीय खून आहे, असे म्हणावे लागते. सर्वच राजकीय नेत्यांचे किंवा पत्रकारांचे खून राजकीय तत्त्वज्ञानासाठी होतात, असे म्हणणे चुकीचे ठरेल. आपल्या देशाचा विचार केला तर जानेवारी १९४८ मध्ये झालेला महात्मा गांधींचा खून हा स्वतंत्र भारतातील पहिला राजकीय खून. त्यानंतर १९७२ मध्ये मुंबई शहरात झालेला कम्युनिस्ट पार्टीचे आमदार साथी कृष्णा देसाई यांचा खून हा दुसरा महत्त्वाचा राजकीय खून. पण पंजाबचे प्रतापसिंह कैरो किंवा ललितनारायण मिश्रा यांचे खून हे जरी राजकीय नेत्यांचे खून होते तरी त्यात राजकीय तत्त्वज्ञानाचा दुरान्वयेसुद्धा संबंध नव्हता. हे खून व्यक्तिगत स्वार्थातून, राजकीय स्पर्धेतून झालेले खून होते. अर्थात खुनासारखा मार्ग अनुसरणारे हे विसरतात की खुनामुळे एका व्यक्तीला गप्प करता येते पण त्या व्यक्तीच्या विचारांना नाही. जानेवारी १९४८ मध्ये मोहनदास करमचंद गांधी नावाच्या माणसाचा खून झाला पण आजही जगभर ‘गांधीवाद’ जिवंत आहे.

 

गौरी लंकेश यांचा खून राजकीय कारणांसाठी केलेला आहे, असे मानण्यास जागा आहे. या संदर्भात अद्याप कोणाला अटक झालेली नाही. यामुळे तर जास्त काळजी वाटते. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांचे मारेकरीसुद्धा अजूनही मोकाटच आहेत.यात मालिकेत गौरी लंकेश यांचे नावसुद्धा टाकले जाऊ नये, ही इच्छा. या प्रकारे जर आपल्या देशातील राजकारण रक्तरंजित झाले तर लोकशाहीचे मरण जवळ आले, असे समजायला हरकत नाही.

 

- प्रा. अविनाश कोल्हे