सेंट जोसेफ शाळेची परवानगीच रद्द - प्रशांत ठाकूर
 महा त भा  12-Sep-2017


पनवेल : नवीन पनवेलमधील सेंट जोसेफ शाळेत पालकांचा गेली दोन वर्षांपासून अवैध फी वाढ आणि अन्य मागण्यांसाठी सुरू असलेला लढा आता अंतिम टप्प्रात आला आहे. आ. प्रशांत ठाकूर यांनी पालकांसोबत आंदोलनात सहभाग घेतला असून आंदोलनाला निर्णायक दिशा देण्यास सुरुवात केली आहे. नवीन पनवेलमधील फिनिक्स सभागृहात सोमवारी दि. ११ सप्टेंबर रोजी आ. ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी पीटीएच्या निवडक पदाधिकार्‍यांसह भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस नगरसेवक विक्रांत पाटील, नगरसेविका दर्शना भोईर, राजश्री वावेकर, संतोषी तुपे, युवा नेते किशोर चौतमल आदी मान्यवर उपस्थित होते. पत्रकार परिषदेच्या सुरुवातीस आंदोलनात पालकांसोबत उतरलेल्या भाजप नगरसेवक विक्रांत पाटील यांनी सेंट जोसेफ शाळा व्यवस्थापनाच्या गैरवर्तणुकीचा पाढा वाचला.

या पत्रकार परिषदेला संबोधित करताना आ. ठाकूर म्हणाले की, ”पालकांनी यापूर्वी शासनाकडे दाद मागितली, त्यावेळी शासनाने दिलेल्या आदेशांना शाळा व्यवस्थापनाने जुमानले नाही. चुकीच्या पद्धतीने अल्पसंख्याक दर्जा धारण केलेल्या या शाळेविरोधात अल्पसंख्याक विभागाकडे तसेच न्यायालयात दाद मागणार आहोत,” अशी मागणी करणार असल्याचे आ. प्रशांत ठाकूर यांनी सांगितले.


''अचानक शाळेची मान्यता रद्द झाली तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे काय? याचा विचार आम्ही करतोय मात्र शाळेला त्याबाबत काही सोयरसुतक नाही. त्यामुळे या शिक्षणसंस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्रांना न्याय मिळेल, असे दिसत नाही म्हणूनच शाळा व्यवस्थापन बदलण्याचीही भूमिका घ्यावी लागेल. ''
- आ. प्रशांत ठाकूर, पनवेल

 

या आहेत मागण्या

१) शैक्षणिक वर्ष सन २००७ पासून केलेली अवैध फीवाढ त्वरित मागे घेऊन शासकीय नियमानुसार व पालक शिक्षक संघाच्या मान्यतेनुसार वाजवी फी घेण्यात यावी.

२) शाळेचा शैक्षणिक दर्जा सुधारण्याच्या दृष्टीने पुरेशा संख्येने अर्हताप्राप्त शिक्षकांची नेमणूक करण्यात यावी.

३) शैक्षणिक नियमानुसारच वर्गात पटसंख्या असावी.

४) धार्मिक शिकवण न देता सर्वधर्मसमभावाची वागणूक द्यावी.

५) शैक्षणिक फीव्यतिरिक्त इतर नावाखाली घेतली जाणारी अवास्तव फी शासन नियमानुसारच घ्यावी आणि त्याची रीतसर पावती मिळावी.