शॉर्ट अॅण्ड क्रिस्प : ब्लाइंडस्पॉट
 महा त भा  12-Sep-2017संशय... एक अशी भावना जी एकदा मनात गेली की नातं पोखरून काढते. कितीही स्वत:ला समजावण्याचा प्रयत्न केला तरी देखील मन उलट दिशेलाच धावतं. बरेचदा आपण डोळ्यांनी काहीतरी बघतो, आपल्या डोळ्यांवर आपल्याला कुणाहीपेक्षा जास्त विश्वास असतो, अगदी कुणाही पेक्षा.. आपल्या प्रेमाच्या व्यक्तीपेक्षाही आणि मग येतो मनात संशय.. पण कधी कधी हाच संशय नातं बळकट करण्यासाठी कारणीभूत ठरतो... असंच काहीसं दाखविण्यात आले आहे या लघुपटात.

ही कथा आहे एका जोडप्याची. बायको राज्यस्तरीय धावपटू असते, सोबतच उत्म नोकरीही करत असते. नवऱ्यासाठी आपले धावणे सोडणारी ही बायको, आपल्या धावपटूच्या आयुष्याला खूप मिस करत असते. नवरा एक उत्तम दिग्दर्शक. आयुष्य छान सुरु असतं. एकदा बायको नवऱ्याला जेवायला बाहेर जाण्याचा आग्रह करते, नवरा कामात असल्याचे सांगून नाही म्हणतो. ती बाहेर पडते, आणि नवऱ्याला एका दुसऱ्या स्त्रीसोबत जवळ जवळ बसलेलं बघते. तिच्या मनात संशयाचा पर्वत निर्माण होतो. आणि इथेच खऱ्या अर्थाने सुरु होतो हा लघुपट. ती तिच्या मैत्रीणीला सगळं काही सांगते. पण ती आपल्या नवऱ्याला आमोरा समोर बसवून जाब विचारते का? तिच्या आणि तिच्या नवऱ्याच्या नात्यात यामुळे काय फरक पडतो, तिच्या नवऱ्याचे खरच लग्नाबाहेर प्रेम प्रकरण असते का? आणि हे सगळं होत असताना तिच्या मनावर तिच्या भावनांवर सोबतच त्याच्या भावनांवर याचा काय परिणाम होतो? हे बघण्यासाठी हा लघुपट नक्कीच बघा.

Embeded Objectटिपीकल प्रेम प्रकरण, लग्नाबाहेर संबंध, आजच्या हाय प्रोफाइल जगण्याचे काही तोटे, किंवा आजच्या पिढीची जीवनशैली आणि त्यांच्या भावना असे सगळे न बघता याहून काहीतरी वेगळे या लघुपटात दाखविण्यात आले आहे. एक वेगळा दृष्टीकोन यामध्ये दाखवण्यात आला आहे. या लघुपटातील काही गोष्टी पटतीलही आणि काही पटणारही नाहीत, मात्र प्रत्येकाने बघितल्यावर हा लघुपट प्रत्येकाला वेगळा भासू शकतो. या लघुपटाला यूट्यूबवर १४ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. उमंग व्यास, पूजा जाधव आणि संगीत यांनी या लघुपटात मुख्य भूमिकेत काम केले आहे, तर लघुपटाचे दिग्दर्शन तानिया देवहंस यांनी केले आहे. एक वेगळा अनुभव घेण्यासाठी हा लघुपट नक्की बघा.

- निहारिका पोळ