केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ 
 महा त भा  12-Sep-2017
 

 
 
नवी दिल्ली :  केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात १ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि निवृत्त वेतनाधारकांच्या महागाई भत्त्यामध्ये १ टक्क्याने वाढ करण्यात आली आहे. अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली. आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आज नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  त्यामुळे महागाई भत्ता आता ४ टक्क्यांवरून ५ टक्के होणार आहे. १ जुलैपासून हा भत्ता लागू करण्यात येणार आहे. याचा ५० लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि ६१ लाख निवृत्त वेतनधारकांना लाभ होणार आहे.
 
Embeded Object
 
चलनवाढीमुळे महागाईत वाढ झाल्याने यापासून दिलासा देण्यासाठी मूळ वेतन आणि पेन्शनवर १ टक्का भत्ता वाढवण्यात आला आहे. महागाई भत्त्यातील अतिरिक्त वाढ ही सध्याच्या ४ टक्क्यांवरून १ टक्का अधिक म्हणजे ५ टक्के इतकी करण्यात आली आहे. सातव्या वेतन आयोगाच्या फॉर्म्युल्याच्या आधारावर ही वाढ करण्यात आली आहे.
 
चालू वित्तीय वर्षाच्या आठ महिन्यांच्या (जुलै २०१७ ते फेब्रुवारी २०१८) या कालावधीसाठी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणि निवृत्त कर्मचाऱ्यांचा महागाई भरपाई यामुळे सरकारी तिजोरीवर अनुक्रमे ३,०६८.२६ व २,०४५.५० कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.
 
Embeded Object
 
दौंड- मनमाड रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी : 

दौंड आणि शिरडी यांच्यामधील रेल्वेरूळ दुहेरी करण्यात येणार असल्याचा निर्णय आज मंत्री मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. पत्रकार परिषदेत केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी ही माहिती दिली. दौंड-मनमाड या रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाला आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज ही बैठक झाली. या मार्गासाठी अंदाजे २०८१.२७ कोटी खर्च येणार आहे. प्रकल्पाचे काम पूर्ण होईपर्यंत २३३०.५ कोटी खर्च अपेक्षित आहे. पाच वर्षामध्ये २४७.५ किलोमिटर लांबीचा रेल्वेमार्ग तयार करण्यात येणार आहे.

रेल्वेमार्ग दुहेरी केल्यानंतर प्रवासीसंख्येत त्याचबरोबर मालवाहतुकीमध्ये होणाऱ्‍या वृद्धीमुळे रेल्वेला चांगला फायदा होणार आहे. दौंड आणि मनमाड भागात असलेल्या औद्योगिक वसाहतींनाही त्याचा लाभ होणार आहे. वाढत्या प्रवाशांना अतिरिक्त सुविधा उपलब्ध होणार आहे. या रेल्वेमार्गाचा महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर आणि नाशिक या जिल्ह्यांना फायदा होणार आहे.