आखाडा परिषदेचे अभिनंदन!
 महा त भा  12-Sep-2017
 
 
 
 
खरंतर स्वत:ला ‘पुरोगामी’ म्हणविणार्‍यांनी आखाडा परिषदेचे जाहीर अभिनंदन करायला हवे होते, परंतु ते तसे करणार नाहीत. कारण, आखाडा परिषदेने जी भूमिका घेतली आहे त्यामुळे यांचे रोजगार आणि वारेमाप प्रसिद्धीच बंद होऊन जाईल. हिंदू धर्माला सुधारणांचे वावडे नाही, मात्र हिंदूंनीच त्यासाठी दोन पावले पुढे येऊन या सुधारणांबाबत रोखठोक भूमिका घेतली की दुसर्‍या श्रेणीतल्या या तथाकथित पाखंड्यांंना मोकळी जागाच शिल्लक राहणार नाही.
 
आपल्या समाजात दोन प्रकारचे पाखंडी लोक आहेत. एक आहेत भगव्यावर विश्वास ठेवणार्‍या श्रद्धाळू लोकांना गंडवून साधुपणातले ऐश्वर्य उपभोगणारे आणि दुसरे आहेत ‘धर्म’ ही संकल्पना मान्यच नसताना सामाजिक सुधारणांचा आव आणून हिंदू धर्मावर टीका करणारे. अखिल भारतीय आखाडा परिषदेने परवा जी भोंदूबाबांची यादी जाहीर केली, त्यामुळे भोंदू लोकांची यादी समोर येऊन ते बाद झालेच आहेत; पण ज्यांची यादी त्यांनी जाहीर केली नाही, असे पाखंडीही बाद झाले आहेत. 
 
खरंतर स्वत:ला ‘पुरोगामी’ म्हणविणार्‍यांनी आखाडा परिषदेचे जाहीर अभिनंदन करायला हवे होते, परंतु ते तसे करणार नाहीत. कारण, आखाडा परिषदेने जी भूमिका घेतली आहे त्यामुळे यांचे रोजगार आणि वारेमाप प्रसिद्धीच बंद होऊन जाईल. हिंदू धर्माला सुधारणांचे वावडे नाही, मात्र हिंदूंनीच त्यासाठी दोन पावले पुढे येऊन या सुधारणांबाबत रोखठोक भूमिका घेतली की दुसर्‍या श्रेणीतल्या या तथाकथित पाखंड्यांना मोकळी जागाच शिल्लक राहणार नाही. हिंदूंच्या सहनशीलतेचा जितका फायदा पहिल्या श्रेणीतले भोंदू घेतात, तितकाच फायदा हे पाखंडीही घेतात. हिंदू धर्मातल्या कुप्रथांवर भडाभडा बोलणारे हे लोक अन्य कुठल्याही धर्माच्या बाबतीत मूग गिळून गप्प बसतात. चमत्कार करणार्‍या पाद्र्यांचे वेदना दूर करण्याचे घाऊक मेळावे लागतात, तेव्हा स्वत:ला ‘अंधश्रद्धा निर्मूलनाचे ठेकेदार’ म्हणविणारे कुठे असतात? याचे समाधानकारक उत्तर निर्मूलनवाल्यांच्या दुसर्‍या पिढीलाही देता आलेले नाही. हिंदू धर्मात सुधारणा घडवून आणणारे अनेक समाजसुधारक सश्रद्ध होते आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार्‍या कार्यकर्त्यांनाही धर्माचे वावडे नव्हते. हिंदू धर्मावर टीका केली म्हणून काही ठराविक जातीयवाद्यांनी त्यांना त्रास दिला, मात्र त्यांच्या विरोधात कोणी फतवे वगैरे काढले नाहीत किंवा त्यांचे शिर कापून आणणार्‍यांना लाखोंची बक्षिसे देण्याची योजनाही कुणी जाहीर केली नाही. 
 
वस्तुत: हिंदू धर्म ही कोण्या एका पोथी-पुराणाची, प्रेषिताची किंवा एका ठराविक व्यवस्थेची मक्तेदारी नाही. आत्मानुभवावर उभे राहिलेली ती एक जीवनपद्धती आहे. या आत्मानुभूतीच्या श्रेणी मात्र ज्याच्या-त्याच्या शरण जाण्यावर अवलंबून आहेत आणि मग काही लोक या विचारांचा बोध झाल्याचा दावा करतात आणि भाबडी जनता त्यांच्या नादाला लागते. सुरुवातीला सगळे बरे चाललेले असते. नंतर मात्र हळूहळू अशी माणसे सत्तेची आणि आर्थिक उलाढालींची केंद्रे होऊन बसतात. आसारामबापू, रामरहिमयांच्यासारख्यांना अटक झाल्यावर त्यांच्याकडे सापडलेल्या स्थावर जंगममालमत्तांचे तपशील अचंबित करणारे आहेत. एका बाजूला ‘गरिबांचा देश’ म्हणायचे आणि दुसर्‍या बाजूला असाहय्य परिस्थितीत जाऊन पोहोचलेल्यांच्या अगतिकतेचा फायदा घेऊन स्वत:च्या सोनेरी झोळ्या भरायच्या, हा इथला धंदाच होऊन बसला आहे. लैंगिक शोषण किंवा बलात्काराचे आरोप म्हणजे आपणही षड्‌रिपूंचे गुलामच आहोत, याचेही भान या तथाकथित संतांना आणि त्यांच्या अनुयायांना राहात नाही. एक मोठा गठ्ठा यांच्या मागे असला की मतांच्या लालसेने राजकारणीही अशा मंडळींना भजायला सुरुवात करतात. तुकाराममहाराज म्हणतात तसे ‘सोंडे झाले संन्यासू’ अशी ही गत झाली आहे. आखाड्याने आज जी भूमिका घेतली आहे, तिचा विचार करण्यापूर्वी लोक अशा लोकांच्या आहारी का जातात, याचा याचाही विचार बारकाईने केला पाहिजे. विवेकानंद म्हणत,‘‘हा देश दरिद्री नारायणाचा आहे,’’ मात्र आता तो केवळ दरिद्री नारायणाचा राहिलेला नाही. आधुनिक समाजाला भेडसावणार्‍या सर्वच समस्या हिंदू समाजालाही भेडसावत आहेतच. मनाला धीर देणारे मंदिर पुरे पडत नाही. त्यामुळे अशा लोकांच्या आहारी ही मंडळी जातात. खेड्यात, वनवासी पाड्यांवर, शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये अशा सर्वच ठिकाणी आज विविध समस्यांनी ग्रासलेले लोक आहेत. कुठले तरी बाबा बंगाली किंवा बाटवाबाटवीचे उद्योग करणारे धर्मप्रसारक अशांच्या अगतिकतेचा फायदा घेतात आणि त्यांना आपल्या जाळ्यात फसवतात. हा आपला समाज आहे आणि त्याच्या हिताची संपूर्ण जबाबदारी आपली आहे, अशी भूमिका जोपर्यंत घेतली जात नाही, तोपर्यंत अशा ढोंग्यांना रान मोकळे मिळणारच आहे. विषमता, जुन्या बुरसटलेल्या रूढी-परंपरा, त्यातून येणार्‍या पवित्र-अपवित्रतेच्या भावना जोपर्यंत आपल्या समाजात राहतील, तोपर्यंत अशा ढोंग्यांची धन होणारच! बाबा रामरहिमला इतका पाठिंबा का मिळाला? याचा शोध घेतला तर थक्क करणारी कारणे सापडतात. शिखांमधल्या कनिष्ठ जातीच्या मंडळींना या बाबाने आपल्या आश्रमात सन्मानाने स्थान दिले आणि त्यांना ओळखही दिली. खरंतर इस्लामचे संकट मोडून काढायला शिखांची निर्मिती झाली. या निर्मितीच्या वेळीच जातीव्यवस्थेला मूठमाती देण्यात आली होती. मात्र, इथल्या जातीयवाद्यांनी हा जातीभेद जपला आणि त्याचा परिणामम्हणून रामरहिमसारख्यांच्या मागे ही मंडळी जाऊन उभी राहिली. याची जबर किंमत हरियाणा राज्याला मोजावी लागली. कायदा- सुव्यवस्थेची स्थिती बिघडलीच, पण अनेकांना प्राणालाही मुकावे लागले. या प्राणहानीबद्दल रामरहिमबाबाने साधा चकारही काढला नाही. 
 
‘आखाडा’ ही साधूसंतांचे नियमन करणारी सर्वोच्च यंत्रणा असल्याचा आखाड्याचा दावा असेल, तर आखाड्यालाही त्यांचा आब राखावा लागेल. पहिल्यांदाच आखाडा असे काही चांगले काम केल्याने चर्चेत आला आहे. एरवी स्वत:ला शंकराचार्य मानणार्‍यांमधले वाद-विवाद, शुल्लक कारणांवरून चालणारे तंटे, मानापमानाचे सोहळे आणि गरज नसताना केली जाणारी भाष्ये यासाठीच आखाड्यासारख्या संस्था ओळखल्या जातात. आता ‘संत कुणाला म्हणावे’ याचे नियमनही आखाडा करणार आहे. मुळात जिथे अनुभूती येते, तिथे लोक जातात. त्यामुळे आखाडा वगैरे रचनांची माहिती नसलेल्यांची संख्याही मोठी आहे. आखाड्याच्या या निर्णयांच्या यादीत असिमानंदाचेही नाव आले आहे. ते का आले याचा जरा शोध घेतला पाहिजे. केवळ कसल्यातरी कायदेशीर कारवाईत अडकलेल्यांनाच ‘भोंदू’ म्हणून जाहीर केले गेले असेल, तर मग आखाड्यांनाही लोक ‘भोंदू’ म्हणतील. मात्र आज का होईना, आखाड्याने जी भूमिका घेतली तिचे नक्कीच स्वागत केले पाहिजे.