अफगाणिस्तानच्या स्वप्नपूर्तीसाठी भारत खांद्याला खांदा लावून चालणार
 महा त भा  11-Sep-2017


 

नवी दिल्ली : आज भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री सलाहुद्दीन रब्बानी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथे द्विपक्षीय चर्चा पार पडली. अफगाणी लोकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करू असे सुषमा स्वराज यांनी याप्रसंगी सांगितले.

 

द्विपक्षीय चर्चेनंतर पत्रकारांना संबोधित करताना सुषमा स्वराज म्हणाल्या, ‘मागील ३ वर्षांपासून दोन्ही देशात महत्वाचा विषयावर आदान प्रदान करण्यात येत आहे. भारत आणि अफगाणिस्तानातील संरक्षण विषयक भागीदारी हि दक्षिण आशियाच्या शांततेसाठी महत्वाची आहे. आजच्या चर्चेतून अफगाणिस्तानात ११६ नवीन प्रकल्प संयुक्त भागीदारीतून उभे करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे अफगाणिस्तानात सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. यात प्रामुख्याने लोकशाही मूल्य जपणाऱ्या संस्था, मानव संसाधन आणि कौशल्य विकास यावर विशेष भर देण्यात येणार आहे. दोन्ही देशातील उद्योग वाढीसाठी २७-३० सप्टेंबर २०१७ रोजी दिल्ली येथे ‘व्यापार आणि गुंतवणूक प्रदर्शन’ आयोजित केले आहे. अफगाणी उद्योजकांना भारतात व्हिसा नियमात ढील देण्यात आली आहे.

Embeded Object


भारत-इराण आणि अफगाणिस्थान यांच्यातील त्रिपक्षीय करारात ठरल्याप्रमाणे इराणच्या चाबाहर बंदराचे काम तातडीने पूर्ण करून अफगाणिस्थानला व्यापारासाठी पर्यायी मार्ग उभा केला जाणार आहे. भारतीय बाजापेठेत अफगाणी शेतकऱ्यांना व्यापार करता यावा यासाठी थेट हवाई मालवाहतुकीचा पर्याय उभा केला जाणार आहे. अफगाणिस्थानात सुरक्षा, शांतता, स्थैर्य, समृद्धी प्रस्थापित करण्यासाठी भारत सतत प्रयत्नशील असणार आहे.’

 

अफगाणिस्थानात काम करणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेसाठी प्राण गमावलेल्या अफगाणी सुरक्षा रक्षकांचे उपकार आम्ही कधी विसरू शकणार नाही असे त्या म्हणाल्या. २०१८ पासून अफगानिस्थानातल्या गृहयुद्धात प्राण गमावलेल्या सुरक्षा रक्षकांच्या मुलांसाठी भारत ५०० नवीन शिष्यवृत्तीच्या योजना सुरु करणार आहे. अफगाणिस्थानच्या क्रिकेट संघाला कसोटी क्रिकेटची मान्यता मिळाल्याबद्दल स्वराज यांनी आनंद व्यक्त केला.