'शांततेची परंपरा पाळूनच गणेशोत्सव साजरा करा - जिल्हाधिकारी पाण्डेय
 महा त भा  09-Aug-2017अकोला : गणेशोत्सव हा मांगल्य आणि समृद्धीचा सण आहे. त्यामुळे आपल्या कसल्याही कृतीमुळे या उत्सवाला गालबोट लागू नये याची काळजी सर्वांनी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे शांततेची परंपरा कायम ठेवून यंदाही सकारात्मक वातावरणात गणेशोत्सव साजरा केला जावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय  यांनी केले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा कार्यालयात आयोजित 'गणेशोत्सव नियोजन बैठकीत' ते बोलत होते.


'गणेशोत्सव शांतते पार पडावा यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्व प्रकारची मदत केली जाईल' असे आश्वासन पाण्डेय यांनी यावेळी दिले. तसेच गणेशोत्सवामध्ये पर्यावरणाची हानी होणार नाही, याची देखील काळजी घेतली जावे. सर्वांनी मातीपासून बनवलेल्या गणेशमूर्तींचा उत्सवात वापर करावा, तसेच शक्य तितक्या लोकांनी 'एक गाव, एक गणपती' असा उपक्रम राबवावा, असे देखील ते म्हणाले.


यावेळी अकोल्याचे पोलीस अधीक्षक राकेश कलासागर हे देखील उपस्थित होते. 'उत्सव काळात सुरक्षेच्याबाबत सर्वतोपरी दक्षता घेतली जाईल. प्रत्येक मंडळाच्या ठिकाणी एक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येईल. गणेश मंडळांना एकाच ठिकाणी सर्व परवानग्या मिळण्याकरीता महानगर पालिकेत एक खिडकी कक्ष स्थापन करण्यात येईल. ध्वनीप्रदुषण, वाहतुककोंडी टाळण्यासाठी सजग राहावे. विसर्जनाच्या ठिकाणी पुरेशी दक्षता घ्या. सोशल मिडियावर कुठल्याही प्रकारची अफवा पसरवू नका. गैरप्रकार आढळल्यास तत्काळ पोलीसांना संपर्क साधा.' असे आवाहन त्यांनी यावेळी केले.