'जमात-उद-दावा' बंदीनंतर हाफिजने सुरु केला राजकीय पक्ष
 महा त भा  08-Aug-2017


इस्लामाबाद (पाकिस्तान) : मुंबई हल्ल्याचा सुत्राधार हाफिज सईद याने आता राजकीय क्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या दबावानंतर पाकिस्तानने जमात-उद-दावावर बंदी घातल्यानंतर हाफिज सईद आणि त्याच्या साथीदारांनी नवीन राजकीय पक्षाची स्थापना केली आहे. 'मिली मुस्लीम लीग' असे पक्षाचे नाव असून हाफिस सईदचा अत्यंत विश्वासू समजला जाणारा सैफुल्ला खालिद याची पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

'पाकिस्तानला एक इस्लामिक आणि कल्याणकारी राष्ट्र बनवण्याच्या उद्देशाने या पक्षाची स्थापना करण्यात आली असल्याचे सैफुल्ला याने सांगितले आहे. पाकिस्तानमधील तळागाळातील लोकांचा आवाज वरपर्यंत पोहचवणे तसेच इस्लामचे रक्षण करणे हा देखील आमचा मुख्य उद्देश असल्याचेही सैफुल्लाने सांगितले आहे.


दहशतवादासंबंधी पाकिस्तानच्या दुटप्पी धोरणामुळे अमेरिकेने पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. त्याच बरोबर पाकिस्तानने दहशतवाद्यांवर कठोर कारवाई कारवाई करावी, असे देखील अमेरिकेने खडसावून सांगितले आहे. त्यामुळे पाकिस्तानने जमात-उद-दावासह पाकिस्तानमधील ७२ संघटनांवर बंदी घातली आहे.

तसेच हाफिजला देखील नजरकैदेत ठेवले आहे. त्यामुळे संघटनेला मिळणारी आर्थिक रसद आणि काश्मीरमधील दहशतवाद्यांना संघटनेकडून करण्यात येणाऱ्या मदतीला अडथळा निर्माण झाले आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रातून आपल्या गुप्त कारवाया सुरु ठेवण्याच्या उद्देशानेच जमात-उद-दावाने हे पाऊल उचलल्याचे अनेकांकडून बोलले जात आहे.