प्राप्तिकर परतावा भरणाऱ्यांच्या संख्येत नोटाबंदीमुळे ४२ टक्के वाढ
 महा त भा  07-Aug-2017नवी दिल्ली : विमुद्रीकरण आणि काळ्या पैशाविरोधात हाती घेण्यात आलेल्या मोहिमेनंतर आता प्राप्तिकर विवरणपत्र दाखल केलेल्यांच्या संख्येत २४.७ टक्के इतकी लक्षणीय वाढ झाली असल्याची बाब समोर आली आहे. काल ५ ऑगस्ट रोजी प्राप्तिकर भरण्याची अंतिम मुदत होती. त्यामुळे कालपर्यंत २ कोटी ८२ लाख ९२ हजार ९५५ एवढी विवरणपत्रे दाखल झाली आहेत. गेल्या वर्षी ही संख्या २ कोटी २६ लाख ९६ हजार ८४३ इतकी होती. ५ ऑगस्ट २०१७ पर्यंत २ कोटी ७९ लाख ३९ हजार ०८३ वैयक्तिक करदात्यांनी विवरणपत्रे भरली. गेल्या वर्षी ही संख्या २ कोटी २२ लाख ९२ हजार ८९४ इतकी होती. यातून हे स्पष्ट होते की विमुद्रीकरणामुळे कराच्या जाळ्यात आणलेल्या नवीन करदात्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे.

 

प्रत्यक्ष कर संकलनातील वाढीवरही विमुद्रीकरणाचा परिणाम दिसून येत आहे. वैयक्तिक प्राप्तिकराच्या आगाऊ कर संकलनात २०१६-१७ च्या तुलनेत २०१७-१८ मध्ये ४१.७९ टक्के वाढ झाली आहे. काळ्या पैशाविरोधात लढण्याच्या सरकारच्या कटिबद्धतेचे सकारात्मक परिणाम वरील आकडेवारीतून दिसून येतात. नोटाबंदीमुळे देशाचे नुकसान झाले असे ओरडणाऱ्या बुद्धिवंतांच्या आरोपाला या आकडेवारीमुळे चांगलीच चपराक बसली आहे.