मुँह है तो सेल्फी हजार
 महा त भा  07-Aug-2017
 
 

 
 
सेल्फी.. उलटसुलट अनाकलनीय आविर्भाव, विचित्र प्रकारच्या सेल्फी का कोण जाणे फेमस. तसा प्रश्‍न विचारल्यावर बहुतेकांचे उत्तर असते, सेल्फी असेच काढतात. असाच ट्रेंड आहे. असू द्यात व्यक्तिस्वातंत्र्य, अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे. तसेही सेल्फीवर विपुल लेखन झाले आहे. पण सेल्फी म्हणजे किलफ्री झाले आहे, असे वाटते. किंबहुना ती आली, तिने जिंकले आणि तिने जीव घेतला, अशी उपमा सेल्फीसाठी येाग्यच. सेल्फी घेताना अनाहूतपणे यमाचा पाश सर्वात जास्त कुठे आवळला जातो तर तो भारतात. जगभराच्या अशा मृत्यूंमध्ये भारतात मृत पावणार्‍यांची टक्केवारी ८७ टक्के आहे. ’’धोकादायक.. विचित्र, आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी..’’ 
 
शनिवारी सिंहगडावर सेल्फी काढताना प्रणिता इंगळे ही गरोदर महिला पाय घसरून पडली. सोबत तिचा भाऊ, पती होते. शेवटी गावकर्‍यांच्या मदतीने जखमी प्रणिताचा शोध घेऊन तिला वाचवले गेले. अशा प्रकारच्या घटना आपण वारंवर वाचतो, ऐकतो, पाहतो. नुसत्या यंदाच्या वर्षाचा विचार केला तर भारतामध्ये धावत्या ट्रेनमध्ये फोटो काढताना, विजेच्या खांबावर चढून फोटो काढताना, हिंस्त्र प्राण्याच्या जवळ आहोत असे दाखवताना, नदी, तलाव, समुद्राची पार्श्‍वभूमी घेऊन फोटो काढताना लोक मृत्यूमुखी पडलेत पण १६ जुलैला चेन्नईमध्ये तर विचारांच्या पलीकडले सेल्फी प्रेम दिसले. तिथे एका बेकरीला आग लागली. भयानक परिस्थिती. बघ्यांची गर्दी जमली. त्यामध्येही लोकांची चढाओढ चाललेली की जळत्या बेकरीची पार्श्‍वभूमी घेऊन सेल्फी काढायचा. तो तसा सेल्फी काढताना तब्बल ४८ लोक आगीमुळे गंभीर जखमी झाले.
 
हे कसले वेड? आम्ही काही तरी विशेष केले, पाहिले, अनुभवले हे जगाला सांगण्याची ओढ ही नैसर्गिक भावना आहे. असे जरी समजून घेतले, तरी या भावनेच्या भरात स्वतःला मृत्यूच्या दारात नेण्याचा आत्मघात लोक का करतात? लोकांचे हे असे जिवघेणे सेल्फी प्रेम पाहून मुंबईमध्ये १६ जागा नॉनसेल्फी झोन जाहीर केले आहेत. नको त्या घातक ठिकाणी जाऊन बेहोश होऊन सेल्फी न काढण्याचे लोकांनी ठरवायला हवे. स्वतःच्या प्रतिमेवर प्रेम असणे चांगलेच. पण स्वतःच्या जीवनावरही प्रेम असेलच ना? अरे बाबांनो! सर है तो पगडी पचास आणि मुँह है तो सेल्फी हजार. 
 
 
 
मराठी भाषेचा वेलू गगनावर
 
जगभरातील सहा हजार भाषांपैकी चार हजार भाषा पुढील ५० वर्षांत लोप पावणार आहेत. गुरुवारी असा अहवाल ’पीपल लिंग्विस्टीक सर्व्हे ऑफ इंडिया’ ने प्रसिद्ध केला. जगभरातल्या भाषांचे सर्वेक्षण करून हा अहवाल तयार केला आहे. भाषांच्या बाबतीत अमाप वैविध्य आणि अपार समृद्धी असलेल्या भारतीय भाषांबद्दल या अहवालात निष्कर्ष काय असेल ? तर, भारतात बोलल्या जाणार्‍या ७८० भाषांपैकी ४०० भाषा येत्या पन्नास वर्षात विलुप्तीच्या मार्गावर आहेत. ही खरे म्हणजे धक्कादायक बाब. भाषा ही त्या त्या भागाची  संस्कृती-सांस्कृतिक वारसा जपणारी उर्जावाहिनी असते. भाषा मरताना, भाषा विलुप्त होताना काय केवळ त्या भाषेचे शब्द, शब्दांची लय, ताल, सूर, अर्थ मरत असतील ? नाहीच, जगाचा निरोप घेताना ती भाषा आपल्यासोबत खास त्या त्या जनमानसांच्या आतल्या जीवनप्रवाहाचा आत्माही घेऊन जात असते. भाषेचे मरणे तर सोडाच नुसती तिची डोळ्यात भरणारी अनुपस्थितीही दाहक असतेच. संस्कृत, देवभाषा. या देवभाषेला आज अतिथी भाषेचे स्वरूप आले आहे किंवा पाली भाषा घेऊ, ही भाषाही आज अतिथीच्या माध्यमरूपातच आहे. दोन भाषांचा दाखला उदाहरणार्थासाठी दिला. अशा कित्येक भाषा डोळ्यासमोरून उडून जात आहेत. भाषेच्या कुशीत हळूच उमलणार्‍या बोलीभाषांनीही कात टाकली आहे. बारा मैलांवर भाषा बदलते, असे अभिमानाने सांगणार्‍यांचा आता इतिहासच झाला आहे. कारण, बोलीभाषेवर पुस्तकी भाषेने केव्हाच मात केली आहे. तूर्तास तो विषय बाजूला ठेवू. विषय असा आहे की, भारतातल्या ४०० भाषा लोप पावतील. मग त्यात माझ्या मराठीचे बोलू कवतिकेचे काय होणार ? असेही अमृतातेही पैजा जिंके असणार्‍या मायबोली मराठीच्या अस्तित्वाबद्दल मराठी मन चिंतन करत असते, अगदी मन चिंती ते वैरी ना चिंती या भूमिकेतून.
 
पण थांबा, आपल्यासाठी उत्साहवर्धक बातमी आहे, भाषातज्ज्ञ गणेश देवी यांनी निर्वाळा दिला आहे की, इंग्रजीमुळे मराठीसह हिंदी, गुजराती, पंजाबी, तेलगू, कन्नड, मल्याळम या भाषांना धोका आहे, असे बोलले जाते पण तसे होणार नाही. कारण या भाषा जगातील प्रमुख पहिल्या ३० भाषांपैकी आहेत. दोन कोटींपेक्षा जास्त लोक या भाषा बोलतात. तसेच या भाषा किमान हजार वर्षांपेक्षाही जुन्या आहेत. भाषेचे जुनेपण सोडा हो पण वळवावी तशी वळत, सतत नाविन्याचे ताजेपण ल्यायलेल्या  मराठी भाषेचा ताजेपणाच मराठी भाषेचा वेलू गगनावर चढविल्याशिवाय राहणार नाही.
 
- योगिता साळवी