आता इस्रो दाखवणार 'दिशा'
 महा त भा  31-Aug-2017


श्रीहरीकोटा : भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रो आज पुन्हा एक ऐतिहासिक कामगिरी करणार आहे. भारतीय सागरीप्रदेश आणि अवकाश मार्गे होणाऱ्या वाहतुकीला अधिक गती देण्यासाठी इस्रो संपूर्ण देशात तयार करण्यात आलेल्या आयआरएनएसएस - 1एच (इंडियन रिजन नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टिम) या दिशादर्शक उपग्रहाचे आज प्रक्षेपण करणार आहे. यामुळे देशाची दिशादर्शक यंत्रणा आणखीन प्रबळ होऊन याच्या फायदा सागरी वाहतुकीला आणि नौदलाला मोठ्या प्रमाणात होणार आहे.


पोलार सॅटेलाईट लॉंच व्हेहिकल (पीएसएलव्ही)च्या सहाय्याने आज संध्याकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ स्थानकावरून हे प्रक्षेपण केले जाईल. पीएसएलव्हीची ही ३९ वी उड्डाण असून याला पीएसएलव्ही-सी ३९ असे नाव देण्यात आले आहे. या मोहिमेसाठी पीएसएलव्हीचे 'एक्सएल' व्हर्जन यासाठी वापरण्यात येणार आहे. याचे एकूण वजन हे १ हजार ४२५ कि.ग्रॅ. इतके असणार आहे.


आयआरएनएसएस - 1एच च्या निर्मितीमध्ये देशात प्रथमच इस्रो बरोबर देशातील काही खाजगी कंपन्यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. बेंगळूरुच्या बेस्ड अल्फा डिजाइन टेक्नॉलजिस या कंपनीच्या नेतृत्वाखाली आयआरएनएसएस - 1एचचे २५ टक्के निर्मितीमध्ये खाजगी कंपन्यांनी आपला हातभार लावलेला आहे. त्यामुळे भविष्यकाळ देशांतर्गत अवकाश संसोधन यंत्रांच्या निर्मितीमध्ये खाजगी कंपन्यांना देखील संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Embeded Object


या अगोदर २०१३ मध्ये प्रक्षेपित करण्यात आलेल्या आयआरएनएसएस-1ए या दिशादर्शक उपग्रहातील तीन यंत्रांमध्ये बिघड झाल्यामुळे आयआरएनएसएस - 1एचच्या निर्मितीचे काम हाती घेण्यात आले होते. दिशा आणि जागेची योग्य माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी युरोपियन कंपनी 'ऑस्ट्रियम'कडून आयआरएनएसएस-1ए साठी यंत्रे विकत घेण्यात आली होते. त्यामुळे आयआरएनएसएस - 1एचच्या निर्मितीमध्ये भारतातील खाजगी कंपन्यांना सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.