विसर्जन मिरवणूकीत कोणालाही डॉल्बी लावू दिला जाणार नाही - चंद्रकांत पाटील
 महा त भा  28-Aug-2017

 

कोल्हापूर : गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये कोणालाही डॉल्बी लावू दिला जाणार नाही. ध्वनी प्रदूषण नियंत्रण कायद्याची कठोर अंमलबजावणी केली जाईल, असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळची गणेश विसर्जन मिरवणूक ऐतिहासिक, उत्साहात, सुरक्षित वातावरणात, शांततेत पण डॉल्बीमुक्तच होईल, असे निक्षून सांगितले.

 

Embeded Object

 

कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी २१ ऑगस्ट रोजी कोल्हापूरात आवाजमुक्त व निसर्गपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात येईल असे म्हटले होते. शहरातील विविध मंडळांच्या प्रतिनिधींसोबत विसर्जन मिरवणूकीच्या नियोजनाची बैठक आयोजित करण्यात आली होती. कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्या उपस्थितीत पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात ही बैठक झाली.

 

डॉल्बीचा वापर केल्यास कलम १४४नुसार संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेशही पालकमंत्र्यांनी आजच्या बैठकीत पोलीस आयुक्तांना दिले आहेत. याची अंमलबजावणी कोटेकोरपणे करण्यात येईल असे आश्वासन विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील आणि पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिले आहे.

 

कोल्हापूरमध्ये यावर्षी एकूण ६५३ सार्वजनिक मंडळांद्वारे गणेशस्थापना करण्यात आली आहे. पर्यावरणाचे निकष व यावर्षी नव्याने लागू केलेले आवाज नियंत्रणाचे नियम यांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्यात येईल, असे आज झालेल्या बैठकीत सर्व उपस्थित गणेश मंडळांच्या प्रतिनिधींना सांगण्यात आले आहे.