जेव्हा जिल्हाधिकारी गणेशमूर्ती तयार करण्यात रमतात...
 महा त भा  24-Aug-2017


अकोला : यंदाचा गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक व्हावा, नागरिकांनी पर्यावरणाच्या संरक्षणासाठी शाडू मातीच्या गणेशाची स्थापना करावी या उद्देशाने जिल्हा प्रशासनकडून काल एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी जन जागृतीसाठी स्वत: आपल्या हाताने शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती तयार केली. तसेच अशाच प्रकराचे उपक्रम राबवून जिल्ह्यातील नागरिक आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आपल्या घरात पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची स्थापना करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


'जिल्हा प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी हे जनतेचे मार्गदर्शक, पथदर्शक असतात त्यामुळे पर्यावरण पुरक गणेश मूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण त्यांना देण्याचे जिल्हा प्रशासनाने ठरविले. त्यानुसार आज शाडू मातीचे गणपती तयार करण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. देवाला मनोरंजनाचा विषय न करता श्रध्दा, विश्वास व उपासनेचा विषय करावा. असे सांगून जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, माझी मूर्ती मोठी किंवा तुझी छोटी हा वादाचा विषय न करता श्रध्दाभाव ठेवून गणेशची स्थापना करावी' असे ते यावेळी म्हणाले.


गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सवामध्ये गणेशमूर्तींच्या निर्मितीसाठी शाडूच्या मातीऐवजी पीओपी (प्लास्टर ऑफ पॅरिस) चा वापर वाढत आहे. पीओपी हे अत्यंत टिकाऊ असल्यामुळे या गणेशमूर्तींचे लवकर विघटन होत नाही, त्यामुळे जलप्रदूषण होऊन पर्यावरणाची हानी होत आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक व्हावा, असे आवाहन पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील केले आहे.