’नैना’ गावांसाठीचा पाणीपुरवठा लवकरच सुरळीत - बबनराव लोणीकर
 महा त भा  24-Aug-2017


पनवेल : नवीन विमानतळ परिसरातील (नैना) गावांना सुरळीत पाणीपुरवठा करता यावा यासाठी दिर्घकालीन उपाययोजना तसेच तात्पुरत्या उपाय योजनेचा आराखडा तयार करावा व या माध्यमातून या गावांनी पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करावे, असे निर्देश पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी मंगळवारी दि. २३ ऑगस्ट रोजी दिले. नैना परिसरातील गावांना सुरळीत पाणी पुरवठा करण्यासंदर्भात मंत्रालयात आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते.

बैठकीस नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव शामलाल गोयल, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, या परिसरातील ग्रामपंचायतीचे सरपंच, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री लोणीकर पुढे म्हणाले की, ”या परिसरातील वाढते शहरीकरण व त्या अनुषंगाने वाढती पाण्याची मागणी लक्षात घेता सिडकोने दीर्घकालीन नियोजन करावे. या परिसरातील गावांना तातडीने पाणी पुरवठा करता यावा यासाठी तात्पुरता उपाय म्हणून सिडकोने व नवी मुंबई महानगरपालिकेने काही एमएलडी पाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे द्यावे व त्या मार्फत या गावांना पाणी पुरवठा करावा.”

या परिसरातील गावांना लागणारे पाणी व शहरी करणामुळे पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन पाणी पुरवठ्याचे नियोजन करावे, अशी मागणी आ. प्रशांत ठाकूर यांनी यावेळी केली.