‘सैराट’च भुत अजूनही उतरलेलं दिसत नाही...
 महा त भा  02-Aug-2017
मराठी चित्रपट सृष्टीसाठी 2016 हे एकप्रकारे ऐतिहासिक सालचं ठरलं. वर्षाच्या सुरूवातीला नटसम्राट सारखा तगडी स्टारकास्ट असणारा चित्रपट प्रदर्शित झाला. सर्वच स्तरातून या चित्रपटाची प्रशंसा झाली तसेच बॉक्स ऑफिसवर सुद्धा चित्रपटाने चांगली कमाई केली. पहिल्या तिमाहीत ‘नटसम्राट’चा पगडा होता पण एप्रिल नंतर मात्र मराठी चित्रपट सृष्टीला सोनेरी दिवस देणारा ‘सैराट’ हा चित्रपट सिल्व्हर स्क्रिनवर झळकला. फँड्री नंतर नागराज मंजुळेचा दुसरा चित्रपट. पाहता पाहता या चित्रपटाने महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात तसेच परदेशातही आपले नाणे खणखणीत वाजवले.


सैराटचा प्रभाव महाराष्ट्रावर इतक्या मोठ्या प्रमाणात पडला होता की, जिथे पाहाव तिथे सैराटचीच चर्चा ऐकायला मिळायची. अगदी विनोदी संदेशांपासून ते वैचारिक व्याख्यानांपर्यंत सगळ्यामध्येच ‘सैराट’चर्चीला जात होता. साधारणत: सहा महिन्याचा कालावधी या ‘सैराट’मय वातावरणातून बाहेर पडण्यासाठी लागला. सैराटची लोकप्रियता केवळ जनमानसात पसरली नव्हती तर त्यानंतर आलेले काही चित्रपट याच कथेच्या आधारावर साकारले असल्याचे लक्षात येऊ लागले.

Embeded Object

आजमितिला सैराट प्रदर्शित होऊन साधारण सव्वा वर्ष होऊन गेलं तरीदेखील ‘सैराट’च्या प्रतिमेची पुन्हा एकदा आठवण करून देणारे चित्रपट येतच आहेत. ‘बबन’ या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. पण हा टिझर बघितल्यावर प्रथमदर्शी तरी तुम्हाला ‘सैराट’ची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. (अर्थात, आता पुढे जाऊन ट्रेलर किंवा चित्रपटातून यापेक्षा काहीतरी वेगळं बघायला मिळाला तर आनंदच आहे, पण एकूणच ग्रामीण बाज, माती आणि बालवयातील प्रेम याच धर्तीवर हा चित्रपट असेल तर त्यात वेगळेपण शोधावं लागेल एवढ मात्र नक्की.) विशेष म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शन भाऊराव कर्‍हाडे यांनी केले आहे. भाऊराव यांनी दिग्दर्शनाच्या पदार्पणात ‘ख्वाडा’ हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट आपल्याला दिला होता. आश्‍चर्य या गोष्टीचं वाटतं की भाऊरावांना पुन्हा ‘सैराट’ स्टाईलचाच चित्रपट मराठी प्रेक्षकांना द्यावा असं का वाटलं असावं..? 

Embeded Object

रांजण चित्रपटाचा ट्रेलर

 

Embeded Object

अ‍ॅटमगिरी चित्रपटाचा ट्रेलर

 

Embeded Object

उंडगा चित्रपटाचा ट्रेलर

ग्रामीण भाग, शाळा किंवा महाविद्यालयात शिकणारे तरूण त्यातून दोघांमध्ये होणारं प्रेम (टिनएजर लव्ह), एक खलनायक आणि अखेर ठरलेला! या एकूणच धाटणीचे चित्रपट आता रसिकांना नकोशे होत आहेत. बरं कथा एकाच धाटणीची असली तर एकवेळ ती पचवता येते पण त्या कथेची मांडणी देखील ‘सैराट’च्या धर्तीवरच असल्याने त्याची तुलना ही होतेच. (ड्रोन कॅमेराचा वापर सैराटनंतर मराठीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होऊ लागला आणि अशा लहान वयातील प्रेमकथांमध्ये तर तो नेहमीचाच वाटू लागला आहे.) सैराट नंतरची सैराटचीच प्रतिमा आपल्यासमोर मांडणार्‍या चित्रपटांची उदाहरणं द्यायची झाली तर रांजण, अ‍ॅटमगिरी हे चित्रपट सांगता येतील. त्याचबरोबर 4 ऑगस्ट रोजी उंडगा हा आणखी एक त्याच धर्तीवरचा चित्रपट प्रदर्शित होतोय. आणि या सगळ्यात भरीत भर म्हणजे भाऊरावांचा आगामी ‘बबन’.


मराठी चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक लवकरच या ‘सैराट’च्या प्रभावातून बाहेर पडून नवीन काहीतरी आपल्या समोर सादर करतील अशी अपेक्षा आहे!