७१% जर्मन नागरिकांना हवामान बदलाची भिती
 महा त भा  02-Aug-2017


बर्लिन (जर्मनी) : जगासमोर असलेल्या आव्हानांपैकी सगळ्यात मोठे आव्हान, सगळ्यात मोठी समस्या म्हणजेच हवामान बदल. यामुळे भारताला तर त्रास होतच आहे, मात्र त्याशिवाय इतर देशांमध्ये देखील त्याचे पडसाद दिसून येत आहेत. एका सर्वेक्षणानुसार जर्मनीतील ७१% नागरिक हवामान बदलाच्या समस्येमुळे भितीच्या सावटाखाली आहेत. तर याच सर्वेक्षणानुसार ६३% जर्मन नागरिकांना दहशतवादाचे भय आहे.

Embeded Objectहे आकडे खूप काही सांगता असून हवामान बदल ही पुढील पिढ्यांसाठी उद्भवलेली एक मुख्य समस्या आहे. राष्ट्रीय निवडणुका लक्षात घेऊन जर्मनीच्या सर्वेक्षणात असे दिसून आले की, ७१% नागरिक यांना हवामान बदलाची चिंता आहे, तर ६३% नागरिकांना दहशतवादाची चिंता आहे. हे सर्वेक्षण कंतार एनिमेटेड इन्स्टिट्यूट तर्फे आयोजित करण्यात आले होते. यामध्ये सुमारे १००० नागरिकांना त्यांच्या सगळ्यात मोठ्या भिती विषयी विचारण्यात आले होते. यामध्ये हवामान बदल याविषयी जर्मन नागरिकांना सगळ्यात जास्त भिती असल्याचे आढळून आले आहे. त्या खालोखाल दहशतवाद ही समस्या मोठी असल्याचेही दिसून आले आहे.

संस्थेच्या संकेतस्थळावर या सर्वेक्षणाचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. या दोन समस्यांशिवाय ६५% नागरिकांनी नवीन युद्धांविषयी भिती व्यक्त केली, तर ६२% नागरिकांनी वाढत्या गुन्ह्यांची संख्या या विषयी आपले भय व्यक्त केले आहे.

"हवामान बदल आणि पर्यावरण विषयक समस्या अनेक वर्षांपासून जर्मन नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरले आहेत." असे मत कांतार एमिनिड येथील राजकीय संशोधनाचे प्रमुख, टॉर्स्टन शानीर-हास यांनी व्यक्त केले. तसेच मध्यपूर्व देशातील शरणार्थ्यांच्या वाढत्या संख्येमुळे आणि गेल्या काही वर्षात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमुळे जर्मन नागरिकांच्या मनात याविषयी भय निर्माण होणे साहजिक आहे, असे देखील ते म्हणाले.

गेल्या वर्षी बर्लिन येथील ख्रिसमस मार्केटमध्ये डिसेंबर मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १२ नागरिक मृत्युमुखी पडले होते, तर ५६ हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले होते, तसेच शार्ले एब्दो या वृत्तपत्राच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याने देखील नागरिकांच्या मनात भितीचे सावट निर्माण केले होते. त्यामुळे हे आकडे बरेच काही सांगून जात आहेत, तसेच या दोन्ही महत्वपूर्ण समस्यांविषयी संपूर्ण जगाने एकत्र येवून काम करणे आवश्यक आहे, असे दिसून येत आहे.