सिंधूजल वाटप प्रश्नी भारत-पाकिस्तानमध्ये पुढील महिन्यात होणार चर्चा
 महा त भा  02-Aug-2017


वॉशिंग्टन : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधूजल वाटप प्रश्नावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी पुढील महिन्यात वॉशिंग्टन येथे बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती वर्ल्ड बँकेने दिली आहे. तसेच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील यांच्यात घेण्यात आलेली पहिली बैठक यशस्वीरित्या पार पडली असून दोन्ही देशांनी पाणीवाटपप्रश्नी सकारत्मक प्रतिसाद दिल्याचेही वर्ल्ड बँकने सांगितले आहे.


सिंधू नदीच्या पाणीवाटपावरून भारत-पाकिस्तान यांच्यात सुरु असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांच्या सचिवांची पहिली बैठक काल पार पडली. यामध्ये दोन्हीमधील वादाचा मुद्दा बनलेल्या काही विषयांवर चर्चा करण्यात आली असून झेलम आणि चिनाब या नद्यांवर भारत उभारत असलेल्या जलविद्युत प्रकल्पांसाठी देखील पाकिस्तानकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे. परंतु यावर अजूनही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे या सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी पुढील महिन्यात वॉशिंग्टन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे व दोन्ही देशांनी आपापसातील चर्चा पुढेही चालू ठेवावी, असे आवाहनही वर्ल्ड बँकेने केले आहे.


चिनाब आणि झेलमवर भारत उभारत असलेल्या जलविद्युत प्रकल्पांना पाकिस्तानकडून सातत्याने विरोध केला जात होता. त्यानंतर गेल्या वर्षी उरी येथील भारतीय जवानांच्या मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जलवाटप करार रद्द करण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे पाकिस्तानचे चांगलेच धाबे दणाणले होते. तसेच या भुमिकेविरोधात पाकिस्तानने वर्ल्ड बँकेकडे मदत मागितली होती.