आफ्रिकेत भूस्खलनामुळे ४०० नागरिकांचा मृत्यू
 महा त भा  16-Aug-2017

 

 
सिएरा लिओन (आफ्रिका) : येथे परवा रात्री झालेल्या भूस्खलनामध्ये ४०० नागरिकांचा मृत्यू झाला असून २०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. नागरिकांच्या मदतीसाठी बचाव कार्य वेगाने सुरु करण्यात आले असून आतापर्यंत २२० जणांचे मृत देह बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आले आहे. जखमी नागरिकांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयाकडे हलवण्यात आले आहे. तसेच किरकोळ जखमी झालेल्यांसाठी प्राथमिक सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.


सिएरा लिओनची राजधानी फ्रिटाऊनपासून काही अंतरावर असलेल्या डोंगराळ प्रदेशात ही घटना घडली आहे. १४ ऑगस्टला संध्याकाळी ८ च्या सुमारास हे भूस्खलन झाले. यामध्ये २५० अधिक घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडली. व घरांमध्ये असलेली चारशेहून अधिक या खाली अडकले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर संबंधित प्रशासनाने तत्काळ बचाव पथकांना घटनास्थळी पाठवले. तसेच आसपासच्या परिसरातील नागरिकांना देखील सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. काल दिवसभरामध्ये एकूण २२० जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तसेच अजून अनेक लोक बेपत्ता असल्यामुळे त्यांच्या शोध घेणे सुरु आहे.

Embeded Object


सिएरा लिओनमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे देशातील अनेक नद्यांना पूर आला आहे. पुराच्या पाण्याने अनेक ठिकाणी कहर केला असून यामध्ये ४० हून अधिका नागरिक वाहून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच अनेक ठिकाणी पावसाचे पाणी गावांमध्ये गेल्यामुळे अनेकांवर विस्थापित होण्याची वेळ आली आहे. सिएरा सरकारकडून नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत केली जात असून नागरिकांनी अशावेळी खचून जाऊ नये, असे आवाहन सिएरा लिओनचे राष्ट्रपती इर्नेस्ट बाय कोरोमा यांनी केले आहे.

सिएरा लिओन हा आफ्रिका खंडाच्या पश्चिम टोकाला समुद्र किनारी असलेला छोटासा देश आहे. जगभरातील गरीब देशांच्या यादीत सिएरा लिओनचा समवेश केला जातो. २७ एप्रिल १९६१ पर्यंत येथे ब्रिटीशांचे राज्य होते. त्यानंतर येथे लोकशाहीवर आधारित सरकार स्थापन झाले होते, परंतु त्यानंतर देशात झालेला अंधाधुंदी कारभार आणि अंतर्गत नागरी युद्धांमुळे आजही हा देश अनेक अडचणींचा सामना करत आहे. २०१४ मध्ये आफ्रिकेत पसरलेल्या इबोलाच्या विषाणूमुळे देशात दीड हजाराहून अधिक लोकांचा बळी गेला होता. .