चीन हा पाकिस्तानचा सर्वात चांगला मित्र - पाक राष्ट्रपती
 महा त भा  14-Aug-2017


इस्लामाबाद : 'चीन हा पाकिस्तानचा सर्वात चांगला मित्र असून त्यांने संकटकाळी नेहमी पाकिस्तानला मदत केली आहे. देशातंर्गत समस्या असो व आंतरराष्ट्रीय पातळीवरील कसलाही मुद्दा असो चीनने नेहमीच पाकिस्तानची बाजू घेऊन त्याला मदत केली आहे' असे प्रतिपादन पाकिस्तानचे राष्ट्रपती ममनून हुसेन यांनी आज केले. पाकिस्ताच्या ७० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त इस्लामाबादमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी हुसेन यांनी पाक-चीन यांच्या मैत्रीचे गोडवे गात, चीनच्या चांगुलपणावर स्तुतिसुमने उधळली.


विशेष या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून चीनचे वाईस प्रेमियर वॉंग यांग हे उपस्थित होते. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचे प्रतिनिधी म्हणून यांग हे या कार्यक्रमला उपस्थित होते. याचबरोबर पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहीद खाकीन अब्बासी, लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा हे देखील यावेळी उपस्थित होते.


चीन आणि पाकिस्तान मैत्री बरोबर पाकिस्तानसमोर असलेल्या अनेक समस्यांचा देखील त्यांनी यावेळी आढावा घेतला. 'देशाला स्वातंत्र्य मिळून आज ७० वर्ष झाली आहेत. तरी देखील देशाने अजूनही हवा तसा विकास केलेला नाही. त्यामुळे देशाच्या विकासासाठी आणि आपल्या भावी पिढीच्या भविष्याच्या रक्षणासाठी पाकिस्तानच्या जनतेनी एकत्र येणे गरजे आहे' असे मत हुसेन यांनी देशातील प्रमुख अधिकारी, नेते, तरुण या सर्वांनी देशाच्या विकासामध्ये हातभार लावला पाहिजे. आपापसातील सर्व द्वेष आणि वाद विसरून देशाच्या एकासाठी एकत्र या असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


पाक-चीनची मैत्री सागराहून खोल - वॉंग यांग

चीनचे वाईस प्रेमियर वॉंग यांग यांनी देखील यावर प्रतिक्रिया देत, चीन-पाकिस्तान मैत्रीचे गोडवे गायले. चीन आणि पाकिस्तान यांची मैत्री अत्यंत अभेद्य असून दोन्ही देश विकासाच्या सर्व टप्प्यांवर एकमेकांच्या नेहमी सोबतीने उभे आहेत, असे ते म्हणाले. तसेच पाक आणि चीनची मैत्री ही पर्वताहून उंच, सागराहून खोल आणि मधाहून गोड असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.


भारताच्या विस्तारवादी धोरणामुळे अडथळा - पाक पंतप्रधान

पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहीद खाकीन अब्बासी यांनी देखील पाकिस्तानच्या सर्व पंतप्रधानांच्या परंपरेला अनुसरून यावेळी देखील काश्मीरचे तुणतुणे वाजवले आहे. आमच्या सरकारने नेहमीच चर्चेतून काश्मीरप्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. परंतु भारताच्या विस्तारवादी धोरणामुळे काश्मीरप्रश्नी नेहमीच चर्चेला अडथळा आला आहे. तरी देखील पाकिस्तान सरकार काश्मिरी जनतेला न्याय देण्यासाठी नेहमीच प्रयत्न करेल, असे मत अब्बासी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला दिलेल्या संदेशामध्ये व्यक्त केले आहे.