पालकमंत्र्यांनी घेतली शहीदाच्या कुटुंबियांची भेट
 महा त भा  14-Aug-2017


लोनाग्रा (अकोला) : जम्मू-काश्मीरमधील शोपिया येथे देशाचे रक्षण करत असताना दहशतवादयांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवान सुमेध वामनराव गवई यांच्या कुटुंबियांची काल पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.


देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना आमचा हा शूर जवान शहीद होऊन अजरामर झाला आहे. त्याचे बलीदान व्यर्थ जाणार नाही. आम्हाला सुमेधचा अभिमान आहे. त्याच्या कुटुंबाला शासन स्तरावरुन सर्व प्रकारची मदत केली जाईल. तरुणांना व गावकऱ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी या ठिकाणी स्मारकाची उभारणी केली जाईल. त्यासाठी पालकमंत्री म्हणून आपण स्वत: पुढाकार घेऊ, असे प्रतिपादन पाटील यांनी यावेळी केले. तसेच 'आपला मुलगा गेल्याचे अतीव दु:ख आहे, मात्र तो देशाची सेवा करत असताना अजरामर झाला याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असे मत सुमेधचे वडिल वामनराव गवई यांनी व्यक्त केले. त्यावेळी उपस्थित सर्वच जण भावनाविवश झाले होते.


शनिवारी शोपिया येथे दहशतवादी आणि भारतीय जवान यांच्यात चकमक झाली होती. यामध्ये सुमेधसह आणखीन एक भारतीय जवान शहीद झाला होता. सुमेधचे पार्थिव आज अत्यंतसंस्कारासाठी त्याच्या मुळगावी आणण्यात येणार आहे. यांच्या पश्चात आई-वडिल, एक बहिण व एक लहान भाऊ असा परिवार आहे.