यावल पंचायत सभापती संध्या महाजन अपात्र
 महा त भा  12-Aug-2017
 

 
पक्षांतर्गत बंदी कायद्यानुसार जिल्हादंडाधिऱ्यांचा आदेश
 
यावल :  यावल येथील पंचायत समितीच्या सभापती काँग्रेसच्या पाठबळावर विजयी झालेल्या संध्या किशोर महाजन यांना पक्षांतर्गत बंदी कायद्यान्वये महाराष्ट्र स्थानिक संस्था सदस्य अनर्हता अधिनियम *(१९८३ कलम ३/१/ख)* अन्वये पंचायत सदस्यपदी अपात्र ठरवायचा आदेश  जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिला आहे. निंबाळकर  यांच्या या आदेशामुळे त्यांच्या निस्पृह न्यायदानाचीही राजकीय  वर्तुळात चर्चा आहे.
 
मार्च २०१७ मध्ये यावल पंचायत समिती सभापती निवड झाली होती. तेव्हा भाजपने अपक्ष उमेदवार . पल्लवी चौधरी यांना सभापतीपदाची उमेदवारी देवून पक्षाच्या पाच सदस्यांनी त्यांना मतदान करावे असा व्हीप बजावला होता.  संध्या किशोर महाजन या भाजपकडून निवडलेल्या सदस्य होत्या. त्यामुळे त्यांनाही भाजपने व्हीप बजावून  पल्लवी चौधरींना मतदानाचा आदेश दिला होता. मात्र सभापती निवडणूकपूर्वी संध्या महाजन यांनी ऐनवेळी काँग्रेसचा पाठींबा घेत स्वतःच सभापती पदाची उमेदवारी केली आणि त्यांनी पल्लवी चौधरींचा पराभव करीत सभापतीपद जिंकले होते.यावलमध्ये भाजप जिंकली व भाजप हरली असे झाले होते.
 
संध्या महाजन यांनी भाजप गटनेता यांचा आदेश डावलल्याने  दीपक पाटील यांनी त्यांच्या विरोधात जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे पक्षांतर्गत बंदी कायद्यानुसार कारवाईची याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी होवून निंबाळकर यांनी सौ. संध्या महाजन यांचे पंचायत समिती सदस्यत्वच रद्द ठरविल्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे आता यावलचे सभापतीपद रिक्त झाले आहे.